वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात विधानसभा निवडणुकीवेळी पेटलेली कलहाची ज्योत आता भडकली आहे. जिल्ह्यात अजित नव्हे तर शरद पवार यांना मानणारा गटच मोठा असल्याचे पक्षफूट झाली तेव्हा दिसून आले होते. पण फुंकर घातल्या गेली नाही. आता प्रदेश नेत्यांनी परत रॉकेल ओतले. स्थापनेपासून जिल्ह्यात पक्ष सांभाळणाऱ्या सहकार गटास आता पुन्हा दुखावले आहे. जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची झालेली नियुक्ती या गटाच्या जिव्हारी झोंबली आहे. कारण सहकार गटच पवार निष्ठा जोपासून पक्ष चालवू शकतो, असा प्रवाह कायम राहिला. प्रथमच या गटास साधी विचारणा नं करता अन्य नेत्यांच्या मर्जीने निर्णय झाल्याची चर्चा आहे. तर नवा नियुक्त जिल्हाध्यक्ष बदलावा म्हणून प्रयत्न सुरू झाले आहे. समीर देशमुख हे त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सहकार गट विरोधक कोण ? तर मामा-भाचे असे उत्तर दिल्या जाते. मामा म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख, तर भाचे म्हणजे खासदार अमर काळे होय.लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी वर्धेची जागा काँग्रेसकडून खेचली. एवढेच नव्हे तर त्या पक्षाचे माजी आमदार अमर काळे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. काळे यांची निवडणूक यंत्रणा अनिल देशमुख यांनीच सांभाळली होती. एक तर उमेदवारी दिली नाही व पुढे काळे-देशमुख हेच सूत्र सांभाळू लागले म्हणून निष्ठावंत सहकार गटात धुसफूस सुरू झाली. नंतर विधानसभा निवडणुकीत या गटास डावलून अतुल वांदिले यांना हिंगणघाटची उमेदवारी दिली.

नाराज माजी आमदार राजू तिमांडे व सहकार नेते सुधीर कोठारी यांनी बंडाचा पवित्रा घेतला. हिंगणघाटचे शरद पवार म्हणून ओळख दिल्या जाणाऱ्या कोठारी यांची नाराजी परवडणारी नाही हे ओळखून खुद्द शरद पवार हे हिंगणघाटला कोठारी यांच्या घरी पोहचले होते. तेव्हा कोठारी यांनी स्पष्ट केले की, आम्ही तुमच्या सोबत पक्षाच्या स्थापनेपासून आहोत. इतर ज्येष्ठ सोडून गेले पण आम्ही साथ कधीच सोडली नाही. आम्ही पक्षाचा पाया रचून इमारत बांधली. आणि वेळवर येत केवळ रंग मारणाऱ्यास संधी दिल्या जाते. हे कसे, असा सवाल कोठारी यांनी केला. पण तिकीट मिळाल्याने वांदिले अधिकृत तर बंडखोरी करीत राजू तिमांडे पण रिंगणात. वांदिले पडले.

पुढे कोठारी व तिमांडे यांनी पवारांची साथ सोडत अजितदादा यांची संगत स्वीकारली. आता माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख हेच जुन्या निष्ठावंत मंडळीपैकी ज्येष्ठ पवारांसोबत होते. मात्र हवा बदलली होती. पक्षाचे सूत्र खासदार अमर काळे यांच्याकडे गेले होते. सहकार गटवाला जिल्हाध्यक्ष हटवून नवा नेमण्याच्या हालचाली सूरू झाल्या. दोन दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आणि वांदिले अध्यक्षपदी आले. ही बाब सहकार गटास झोंबणारी ठरली आहे. पदासाठी ईच्छुक समीर देशमुख यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण हा खेळ मामा भाचा जोडीचा आहे, असेच बोलल्या जाते. त्यावर प्रतिक्रिया देतांना खासदार काळे म्हणतात, मी सर्व मिळून ठरवा अशी भूमिका प्रदेश समितीत मांडली होती. माझा स्वतःचा कोणताच इंटरेस्ट नव्हता. मी बैठकीतून निघून आलो. त्यानंतर मध्यरात्री जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले असावे, असे मत खासदार व्यक्त करतात.

दुसरी बाब म्हणजे सहकार गटाने किमान आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर चर्चा करीत ठरवू, असे म्हटल्याचे गटाच्या एका नेत्याने सांगितले. पण विरोधी खासदार गटाने मात्र मोर्चेबांधणी करून पद खेचलेच. या घडामोडी संघर्षाची नांदी समजल्या जातात. कारण तिकीट वाटपात आता खासदार गट आघाडीवर राहणार तर सहकार गट मागे पडणार, अशी शंका व्यक्त होते. सहकार गटनेते समीर देशमुख हे या संदर्भात एक दोन दिवसात भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले. एकट्या वांदिले यांना किती व कुठवर देत राहणार. पक्ष हिंगणघाट पुरता मर्यादित करणार कां. जिल्हा मुख्यालयी शरद पवार यांचा फोटो तरी किमान झळकणार कां, असे प्रश्न नाराज नेते उपस्थित करीत आहे.