नागपूर: राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आला. त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचं दिसून आले. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मतचोरीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मतदारांनी एका उमेदवाराला दिलेले मत हे दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा दावा या प्रात्यक्षिकातून करण्यात आला. व्हीव्हीपॅटमध्येही मतचोरी शक्य असल्याचा दावा या प्रात्यक्षिकांमधून करण्यात आला.

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागपूर दौऱ्यावर असताना मतचोरीवरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहीत पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय शिबीर घेतले. या शिबिरात सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मतचोरीच प्रात्यक्षिकही दाखवले. यासंदर्भात ॲड. शेलार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जर मतचोरीचा आरोप करत असेल तर शरद पवार गटाच्या नेत्यांची आधी राजीनामा देण्याची गरज आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे दोघेही याच मतदान प्रक्रियेतून निवडून आले आहेत. त्यामुळे ते जर मतचोरीचा आरोप करत असतील तर त्यांनी सर्वात आधी राजीनामा देणे आवश्यक आहे. स्वत: त्याच इलेक्ट्रॉनिक मशीन व्यवस्थेतून निवडून येणाऱ्याना हा आरोप शोभत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घेऊनच मग चोरीचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करावा. अन्यथा शहाणपणा आम्हाला शिकवू नये, असेही शेलार म्हणाले.

शरद पवारांना करून दिली त्या वक्तव्याची आठवण

रविवारी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. हैदराबाद गॅझेटवर आधारित निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले. पण या गॅझेटमध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हीजेएंटी बंजारा यांना आदिवासीच स्थान यामध्ये देण्यात आले आहे. आता बंजारा समाजाने मागणी सुरू केली आहे. काही झाले तरी चालेल पण आता आम्हाला आदिवासीमध्ये घातले पाहिजे. याचा अर्थ काय तर समासामाजामध्ये कटूता वाढेल असे निर्णय घेतलेजात आहेत असे पवार म्हणाले. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे पवार म्हणाले. यावर टीका करत ॲड. शेलार यांनी पुण्यात आता कोणती पगडी चालते ते आम्ही पाहू, असे पवार म्हणाले होते. या वक्तव्याची आठवण करून दिली.