नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही राजकीय गुन्हेगाराविरुध्द कारवाई करण्यास मोकळीक दिल्याने नाशिक शहर पोलिसांनी बऱ्याच वर्षानंतर त्यांचा रौद्रावतार दाखविण्यास सुरुवात केली आहे. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले. आणि शहर पोलिसांनी राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्यांची गठडी वळण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक गुन्हेगारांना पोलिसा हिसका बसण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित मंडळींचा अधिक सहभाग आहे. पोलिसांनी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, वदवून घेतले.

शुक्रवारी ही वेळ भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या मामा राजवाडेवर आली. त्यामुळे यापुढे कोणकोणत्या राजकीय गुन्हेगारांवर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणण्याची वेळ येते. याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाशिककरांचे लक्ष लागलेले असताना रविवार हा दिवसही त्यासाठी कारणी लागली. यावेळीही भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्यांवरच ही वेळ आली.

गुन्हेगारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती गळ्यापर्यंत आल्यावर अखेर नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांविरुध्द कारवाईला सुरुवात केली. त्यासाठी नाशिक पोलिसांना एक कारण हवे होते. आणि ते सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबारामुळे मिळाले. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पुत्र भूषण लोंढे यासह त्याच्या टोळीतील काही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.

याच प्रकरणात पोलिसांनी थेट रिपाइंचा ज्येष्ठ नगरसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रकाश लोंढे यालाच उचलले. प्रकाश लोंढे हा बाॅस म्हणून ओळखला जातो. तसेच त्याच्या दीपक लोंढे उर्फ नाना या मुलालाही ताब्यात घेतले. लोंढे पिता-पुत्रांची टोळी सातपूर, अंबड परिसरात पी. एल. ग्रुुप म्हणून ओळखली जाते. हा परिसर औद्योगिक कंपन्यांचा आहे. रात्री कामावर जाणाऱ्या तसेच कामावरुन परतणाऱ्यांना गाठून, त्यांना धमकावत पैसे हिसकावून घेण्याचा उद्योग या टोळीतील गुंड करीत असल्याची अनेकांची तक्रार आहे. याशिवाय अपहरण, हत्येची धमकी, खंडणी असे प्रकारही या टोळीकडून झाले आहेत.

हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना न्यायालयात नेतांना नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. त्यानंतर अजून एका गोळीबार प्रकरणात पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांच्याबरोबर भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला अटक केली. त्यास शुक्रवारी न्यायालयात नेतांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले. याच प्रकरणात फरार असलेला सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल आणि त्याचे साथीदार सचिन कुमावत, पप्पू जाधव यांच्या मुसक्या मध्य प्रदेशात जाऊन आवळल्या. या तिघांचा रविवारी क्राईम ब्रँच युनिट -१ कार्यालयात यथोचित सत्कार केल्यावर कार्यालयातून बाहेर काढल्यावर त्यांच्याकडून नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले.