धुळे : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच जिल्ह्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय कारभार सुरू होता. प्रशासकांच्या अखत्यारीत विविध योजना, निधी आणि ठेकेदारी पद्धतीने अनेक कामे झाली. या काळात लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसल्याने प्रशासकीय अधिकार्यांना मोकळे मैदान मिळाले होते. परंतु निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे कार्यालये आणि स्थानिक कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे.

धुळे जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेली पिंपळनेर नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्षवेधी ठरत आहे. नव्याने स्थापन झाल्यामुळे येथे सर्व राजकीय पक्षांसाठी उमेदवार निवड हा पहिला मोठा टप्पा आहे. पिंपळनेरमध्ये काँग्रेस पक्षाला नव्याने संघटन उभे करून उमेदवारी ठरवावी लागणार आहे. माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीव प्रवीण चौरे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि चौरे कुटुंबीय हे पिंपळनेर मध्येच वास्तव्यास आहेत. यामुळे चौरे यांना काँग्रेस तर्फे ही निवडणूक लढविणे सोपे जाऊ शकते असा दावा काँग्रेसच्या निष्ठावानंतरर्फे केला जातो परंतु सद्यस्थितीत मात्र पिंपळनेर आणि परिसरामध्ये भाजपाचा प्रभाव आहे. हा प्रभाव काँग्रेस पक्ष कसा मोडीत काढू शकतो हे आता पाहणे रंजक ठरणार आहे. स्थानिक स्तरावर पक्षाची संघटनात्मक पातळी कमजोर असल्याने नेतृत्वाला नव्याने कार्यकर्ते जोडण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची रांग लागली आहे, परंतु पक्षात उमेदवारी कोणाला द्यावी यावरून आंतरिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही गटांकडूनही उमेदवार उभे राहण्याची तयारी सुरू असून, पिंपळनेरमधील निवडणूक स्थानिक तसेच जिल्हास्तरावरील प्रतिष्ठेचा प्रश्न ठरणार आहे.

शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक देखील तितकीच चुरशीची होणार आहे. या तालुक्यात गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षातील अनेक प्रभावी नेते आणि कार्यकर्ते इतर पक्षांकडे वळल्याने काँग्रेसची संघटना कमकुवत झाली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी पात्र उमेदवारांची कमतरता जाणवणार आहे. तरीसुद्धा पक्षात राहिलेल्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आधारावर स्थानिक नेतृत्व निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल हे शिंदखेडा तालुक्यातील प्रमुख आणि प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तालुक्यात मजबूत संघटन उभारले असून, त्यांच्या प्रभावामुळे पक्षाची पकड शिंदखेडा नगरपंचायतीत अधिक दृढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना गती दिली असून, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि बाजार समित्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा विजय टिकविणे ही केवळ पक्षाची नव्हे तर पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रतिष्ठेची बाब ठरणार आहे. विरोधकांनी मात्र स्थानिक मुद्दे, विकासातील असंतुलन आणि प्रशासनातील नाराजी या मुद्द्यांवरून या निवडणुकीत हल्लाबोल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जयकुमार रावल यांच्या प्रभावाचीही मोठी कसोटी ठरणार आहे.

दुसरीकडे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी शिंदखेड्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. विकासकामे, नगरपंचायतीतील निधीवाटप आणि पूर्वीच्या प्रशासनावरील असमाधान या मुद्द्यांवर निवडणूक लढविण्याचे धोरण आखले जात आहे. अपक्ष उमेदवारांनाही या निवडणुकीत संधी निर्माण झाली असून, स्थानिक लोकप्रियता आणि गटबाजीवरच निकाल अवलंबून राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवारीच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. शहरात पोस्टर्स, बॅनर्स आणि भेटीगाठींची लगबग सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत. सत्ताधारी पक्षासाठी उमेदवार निवडण्याचे गणित अवघड बनले आहे, तर विरोधी पक्षांना योग्य उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपळनेर आणि शिंदखेडा नगरपंचायतींची निवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील सत्ता मिळविण्याची लढाई नसून, प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची आणि विशेषतः राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाची खरी अग्निपरीक्षा ठरणार आहे. लोकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि राजकीय समीकरणे यांच्या छेदनबिंदूवर ही निवडणूक उभी आहे. आता पाहावे लागेल की कोणत्या पक्षाचे नेतृत्व ही कसोटी पार करते आणि कोणाचा राजकीय पाया अधिक मजबूत ठरतो.