नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापनासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठीच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय झाला होता. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक रोड रेल्वेस्थानकात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर अशा प्रकारची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यामुळे देशातील ७३ रेल्वे स्थानकांमध्ये आता नाशिकचा समावेश करण्यात आला.

भुजबळ यांना त्यासाठीच्या तयारीची आणि प्रस्तावित कामांची माहिती देणारे २१ ऑगस्ट रोजीचे मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाच्या वतीने पत्र प्राप्त झाले. त्यानुसार प्रत्येकी पाच हजार प्रवासी क्षमता असलेले २१०० चौरस मीटरचे कायमस्वरूपी आणि तात्पुरते अशा दोन स्वतंत्र भागात प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी अशी सर्व व्यवस्था राहणार आहे. याशिवाय प्रवाशांसाठी तिकीट नोंदणी कक्ष, जन उदघोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, एआय आधारित कॅमेरे, प्रवाशांचे साहित्य तपासणीसाठी स्कॅनर या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. तसेच एक केंद्रीकृत नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल.

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची तीन कोटींहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे, ही संख्या २०१५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत सुमारे ५० पट अधिक आहे. नाशिक रोड हे एसजी-२ श्रेणीतील रेल्वे स्थानक असून कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची ही संख्या आणखी वाढणार आहे. कायमस्वरूपी व्यवस्थेतंर्गत सण- उत्सव काळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना रेल्वे येईपर्यंत स्थानकाबाहेरील प्रतीक्षास्थळांवर थांबवले जाणार आहे. फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच फलाटावर प्रवेश दिला जाणार आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या इतर विविध उपाययोजना नुसार या ठिकाणी प्री-तिकीट क्षेत्र करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी या जागेत अंदाजे २७०० प्रवासी बसू शकतील. तसेच तिकिट क्षेत्र परिसरात ३१०० प्रवाशांची सोय होऊ शकते. पोस्ट तिकीट क्षेत्रामध्ये सुमारे १३५० प्रवासी सामावून घेऊ शकतात. यात रांगेत उभे राहणे, सुरक्षा तपासणी, साहित्य स्कॅनिंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध राहणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने दोन्ही शहरांमध्ये कामांना हळूहळू गती येऊ लागली आहे. या दोन्ही ठिकाणी संपूर्ण भारतातून रेल्वेव्दारे येणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकात करावयाच्या सुविधा कामांना मंजुरी मिळाली आहे. या सुविधांमुळे कुंभमेळा काळात गर्दीचे व्यवस्थापन होऊन भाविकांना सुरक्षित व सुलभपणे आपली धार्मिक यात्रा पूर्ण करता येणार आहे.