नाशिक – तब्बल ३१० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनही प्रमुख नेते अनुपस्थित होते. महाराष्ट्रातील या सर्वात देखण्या आणि आधुनिक इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाले होते. त्या कार्यक्रमास न्या. गवई हे उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली मनिषा उद्घाटन सोहळ्यात न्या. गवई यांनी कथन केली.

शनिवारी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. त्यांनी या इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्या. मकरंद कर्णिक, न्या. सारंग कोतवाल आणि न्या. अश्विन भोबे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यातील हे प्रमुख नेते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी छगन भुजबळ,नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे हे मंत्री उपस्थित होते. दादा भुसे अनुपस्थित होते. मुख्यमंत्री येणार नसल्याने भाजपच्या स्थानिक आमदारांची अनुपस्थिती जाणवली. कार्यक्रमात राजकीय गर्दी कमी असली तरी जिल्ह्यातील वकीलवृंद मात्र उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. पोलीस कवायत मैदानावरील सभागृह वकिलांच्या गर्दीने खच्चून भरले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अनुपस्थितीचे कारण न्या. गवई यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौरा कार्यक्रमात शनिवारी पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी चार जी भ्रमणध्वनी नेटवर्कचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख होता. पंतप्रधान मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाची वेळ आणि नाशिक येथील कार्यक्रमाची वेळ काहिशी एकच असल्याने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यात न्या. गवई यांनी या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमातील काही आठवणी कथन केल्या. चार वर्षांपूर्वी या इमारतीचे भूमिपूजन न्या. गवई यांच्या उपस्थितीत झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा या इमारतीच्या उद्घाटनावेळी आपण दोघे उपस्थित राहू, असे म्हटले होते. परंतु, तो योग नव्हता. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. ते कायम सकारात्मक असतात. न्यायिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारने नेहमी बळ दिल्याचे न्या. गवई यांनी नमूद केले.