नाशिक – उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे राज्यासह देशातील अनेक भागातील नैसर्गिक आपत्तीत धाव घेऊन मदत कार्यात सक्रिय होतात. नैसर्गिक असो किवा राजकीय, कोणत्याही संकटकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सहकारी इतर मंत्र्यांपेक्षा गिरीश महाजन यांचीच आठवण येते, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचक अशी निर्माण झालेली त्यांची प्रतिमा अधिकच घट्ट होत आहे.
जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश महाजन हे राजकीय कौशल्याच्या बळावर अल्पावधीत भाजपसाठी संकटमोचक झाले. जळगाव जिल्ह्यातील लोकसभा आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबर महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करुन त्यांनी त्यांचे कौशल्य सिध्द केले आहे.
राजकीय व्यूहरचनेत तरबेज असणारे गिरीश महाजन हे नैसर्गिक संकटावेळीही मुख्यमंत्री फडणवीस यांना आपला मदतीचा हात वाटतात. कदाचित, त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी सोपवली. उत्तराखंड राज्यातील आपत्तीत महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले. सायंकाळपर्यंत ते देहरादूनमध्ये दाखल होत आहेत.
आजवर राज्यातील नव्हे तर, देशातील विविध आपत्तीवेळी गिरीश महाजन यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०१९ मधील सांगलीत पाणी शिरल्यानंतर एनडीआरएफ जवानांबरोबर ते पाण्यात उतरून बचाव कार्यात सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत २०२३ मधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेवेळी महाजन हे अंधार, पावसात पहाटे तीन वाजता घटनास्थळी पोहोचले होते. २०१८ मध्ये केरळला महापुराचा तडाखा बसला होता. तेव्हा १०० डॉक्टरांचे पथक आणि वैद्यकीय सामग्री घेऊन जाण्यात ते आघाडीवर होते.
मागील जून महिन्यात पुण्याच्या मावळमध्ये इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला. जवळपास ४० जणांना वाचविण्यात यश आले होते. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला होता. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने अडकले होते. तेव्हाही महाजन यांनी श्रीनगरला दाखल होऊन पर्यटकांना धीर देत महाराष्ट्रात आणण्याचे नियोजन केले होते. प्रत्येक संकटावेळी धावून जाणारी व्यक्ती अशी गिरीश महाजन यांची ओळख झाली आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले असता त्यांचे मन वळविण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम महाजन यांनाच अंतरवली सराटीत पाठविले होते. या शिवाय महायुतीतील मित्रपक्षांशी चर्चेवेळीही महाजन यांची भूमिका महत्वपूर्ण असते. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी संत, महंतांशी चर्चेची जबाबदारी मागील कुभमेळ्यावेळीही त्यांच्यावर होती. आणि आगामी कुंभमेळ्यासाठीही त्यांनाच संत, महंतांची एखाद्या गोष्टीवरुन निर्माण होणारी नाराजी दूर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.