लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबार – राज्यात सिकलसेलची रुग्णसंख्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने सिकलसेल स्कॅनिंग प्रयोगशाळा हा जिल्हा, राज्य आणि देशात राबवला जाणारा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे हा प्रयोग संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने सिकलसेल स्कॅनिंग प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल, ब्रिगेडियर डॉ. मुथ्थुकृष्णन, कर्नल डॉ. उदय वाघ, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-मनमाडकरांना पालखेड आवर्तनाची प्रतीक्षा, सध्या २२ दिवसाआड अनियमित पाणी पुरवठा

पालकमंत्री पाटील यांनी, पूर्वी सिकलसेलचे नमुने घेतल्यानंतर ते मुंबई किंवा पुणे येथे पाठवले जात होते, असे सांगितले. अहवाल प्राप्त होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी जात असे. आता या प्रयोगशाळेच्या माध्यमातून तात्काळ अहवाल प्राप्त करून सिकलसेल सकारात्मक रुग्णावर उपचाराची दिशा निश्चित करता येणार आहे. स्कॅनिंगसाठी रुग्णाला १८० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. जनआरोग्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजनातून जे काही करता येईल ते करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. सिकलसेल या आजारावर केवळ जनजागृती हाच इलाज असून त्यासाठी स्थानिक बोलीभाषेतील लोककलेतून जनजागृती करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आणखी वाचा-नाशिक : वाहतुकीत अडथळ्यामुळे दुकानदार, फळ विक्रेत्यांविरुध्द गुन्हा

आर्म फोर्स वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत दिवसाला ११ हजार रुग्णांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे स्कॅनिंग केल्यास त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी आदिवासी विभागामार्फत उचलण्यात येईल. तसेच अशा प्रकारची प्रयोगशाळा कायमस्वरूपी जिल्ह्यात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येईल, असा विश्वास डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मनोगत व्यक्त केले. लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल यांनी प्रास्ताविक केले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countrys first sickle cell scanning laboratory in nandurbar inaugurated by guardian minister anil patil mrj