नाशिक : कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी संपर्क साधला होता. सिकंदरला न्याय देण्याची मागणी केली होती. अखेर, न्यायालयाने सिंकदरविरुध्द यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने सिकंदर सराव करीत असलेली कोल्हापूरची गंगावेश तालीम चर्चेत आली. आजवर अनेक मल्लांना, कुस्तीपटूंना घडविणाऱ्या गंगावेश तालीमशी पैठणीसाठी प्रसिध्द नाशिक जिल्ह्यातील येवल्याचाही संबंध आहे.

सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असून तो सैन्यात क्रीडा कोट्यातून भरती झाला होता. नंतर त्याने नोकरी सोडली. कला शाखेचा पदवीधर असलेला सिकंदर विवाहित आहे. एका गरीब कुटुंबातून येऊन सिकंदरने आपल्या कष्टाने तालमीत तासंतास घाम गाळून शरीर कमावले, कुस्तीचे मैदान गाजवले, कुस्तीच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. कुस्तीच्या जोरावर तो वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची बक्षीसे मिळवतो. अनेक गाड्या त्याने जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब-हरियाणासह देशभरात ख्याती मिळवलेला हा पहिलवान या अशा छोट्याशा चोरीच्या धंद्यात स्वतःला गुंतवणाराच नाही. त्याला जर असे करायचे असते तर त्याने कुस्तीसाठी एवढी मेहनत कशाला केली असती, त्याला अशा काळ्या धंद्याची गरज नाही,असा दावा महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी आणि पहिलवान भगवान चित्ते यांनी केला आहे.

माझ्या मुलाला फसविण्यात आल्याचा आरोप सिकंदरच्या कुटुंबियांनीही केला आहे. तसेच मराठी पहिलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पहिलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकते, असा संशय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला. हमाली करणाऱ्या वडिलांनी मुलाला जागतिक दर्जाचा पहिलवान बनवले. सिकंदर शेखने पंजाब-हरियाणातील शेकडो पहिलवांना पराभूत केले आहे. सिकंदर वर्षभरात चारशेपेक्षा अधिक कुस्त्या खेळतो. सिकंदरला १४ थार, १० बुलेट आणि ४० म्हशी बक्षीस म्हणून मिळाल्या आहेत. एवढं सर्व असताना तो गुन्ह्यात कसा सहभागी होईल, असे विचारले जात आहे.

सिकंदर कोल्हापुरातील ज्या गंगावेश तालमीत सराव करतो, त्या तालमीशी आमचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. सिकंदरने प्रामाणिकपणे सराव करून हे यश संपादित केले आहे. तो कुस्तीव्यतिरिक्त अशा कोणत्याही घाणेरड्या धंद्याकडे जाऊ शकत नाही. अशा गुणी पहिलवानाला महाराष्ट्राच्या पुत्राला उत्तर भारतातील कुस्तीमधील गटाने स्पर्धेतून बाद करण्यासाठी कटकारस्थान केले आहे. या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत., असे येवल्यातील महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी आणि पहिलवान भगवान चित्ते यांनी म्हटले आहे.

प्रकरण काय ?

कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख यासह इतर तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी या संशयितांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पाच महिन्यांपासून पंजाबमधील मुल्लांपूर गरीबदास येथे सिकंदर भाड्याच्या घरात राहत होता. शस्त्र तस्करी साखळीत त्याने मध्यस्थाची भूमिका निभावल्याचा पोलिसांचा संशय आहे. सिकंदर यास जामीन मिळाला आहे.