धुळे : शैक्षणिक शुल्क न भरल्याने शहरातील प्रतिष्ठीत चावरा इंग्लिश मीडियम स्कूल (मिशनरी) या शाळेत दररोज काही तास ३५ ते ४० विद्यार्थ्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात येत वाचनालयात (लायब्ररी)च्या खोलीत डांबून ठेवण्यात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर अनेक पालकांनी विद्यालयात धाव घेत सीसीटीव्ही चित्रणाची मागणी करीत बुधवारी रात्रभर ठिय्या दिला. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

१६ जून रोजी चावरा इंग्लिश मीडियम स्कूल (मिशनरी) शाळा सुरु झाली. दुसऱ्या दिवसापासूनच व्यवस्थापनाकडून शुल्क भरण्यासंदर्भात प्रक्रिया प्रारंभ झाली. ॲड. प्रवीणकुमार परदेशी यांची दोन मुले इयत्ता सातवी आणि चौथीच्या वर्गात शिक्षण घेतात. या दोन्ही विद्यार्थ्यांसह शाळेतील अन्य काही विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क अद्याप भरलेले नाही.

यामुळे शाळा व्यवस्थापनाने शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या अंधार्या खोलीत एक दुसऱ्यापासून दररोज दिवसातील काही तास दूर वेगळे बसविणे सुरु केल्याचा आरोप ॲड. परदेशी यांनी केला. ३५ ते ४० विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शाळेत दाखल झालेल्या पालकांनी सीसीटीव्ही चित्रण दाखविण्याची मागणी केल्यावर व्यवस्थापनाने त्यास नकार दिला. भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्यामार्फत सर्व प्रकार मंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत पोहोचविला. त्यानंतर थेट मंत्रालयातील सूत्रे हलली. शालेय व्यवस्थापनाने सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

शिक्षण अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. ॲड. परदेशी यांनी शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन आणि देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात निवेदनाव्दारे कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात शाळेचे प्राचार्य जॉर्ज यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कापडणीस यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यास शाळेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नमूद केले.

संबंधित शाळेचे सीसीटीव्ही चित्रण प्रशासनाला प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक त्रास झालेला दिसल्यास कायद्याने कारवाई करण्यात येईल. शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना निरोप देता येतो. तरीही शुल्क न भरल्यास नोटीस बजावता येते. विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची कोणतीही गरज नाही. – मनीष पवार (शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, धुळे)