धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांच्या नेमणुका जाहीर केल्याने धुळे जिल्ह्याचे राजकारण नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आलेल्या या यादीत धुळे शहर निवडणूक प्रमुखपदी आ. अनुप अग्रवाल, तर धुळे ग्रामीण निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार कुणाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नेमणुकांमुळे जिल्ह्यातील भाजप संघटनात नवचैतन्य संचारले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त आ. अनुप अग्रवाल यांनी आपल्या संघटन कौशल्याने पक्षाला पूर्वी अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे.
भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षपदापासून ते विधानसभा प्रमुखपदापर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळताना धुळे महापालिकेत पक्षाला स्वबळावर ५० हून अधिक जागा मिळवून दिल्या होत्या, तसेच साक्री नगरपंचायतीत पहिल्यांदाच भाजपला बहुमताने सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धुळे शहराच्या विकासासाठी त्यांनी आमदार म्हणून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले असून, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात त्यांचा आदरयुक्त प्रभाव आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आगामी निवडणुकीच्या रणनितीत शहराच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्यावर सोपविली आहे.
आ. अग्रवाल यांनी या नेमणुकीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या विश्वासाला पात्र ठरत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने ‘शत प्रतिशत भाजप’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्नशील राहीन.”
दरम्यान, धुळे ग्रामीण निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा होताच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. जनसंपर्क, संघटनशक्ती आणि विकासाभिमुख कार्यासाठी ओळखले जाणारे पाटील यांना पक्षाने दिलेली ही जबाबदारी त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल असल्याचे मानले जात आहे. भाजप तालुका सरचिटणीस कमलेश भामरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे तालुक्यासाठी एक खरा ‘कोहिनूर हिरा’ शोधला आहे. कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल आणि स्थानिक विकासाची गती वाढेल.”
धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या दोन्ही नेमणुका अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. मात्र आता भाजपने संघटनशक्तीला चालना देत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पातळ्यांवर अनुभवी नेतृत्व नेमले आहे. आ. अनुप अग्रवाल आणि कुणाल पाटील या दोघांचे नेतृत्व पक्षाच्या स्थानिक जनाधाराला एकत्र आणण्यास हातभार लावेल, असा राजकीय जाणकारांचा विश्वास आहे.
आगामी निवडणुकीआधीच या नव्या नेमणुकांतून भाजपने धुळे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. शहरात विकासाभिमुख प्रतिमा आणि ग्रामीण भागात जनसंपर्क व कार्यकर्त्यांचा विश्वास या दोन्ही बाजू एकत्र आणण्याचा भाजपचा जाणीवपूर्वक प्रयत्न असून यातूनच आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक आघाडी मिळू शकेल असे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना वाटते आहे. एकूणच, जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता खऱ्याअर्थाने निवडणूक रणसज्जतेकडे वळले असून, आ. अनुप अग्रवाल आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून विजयाची नवी रणनीती आखली जाते आहे.
