जळगाव : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दररोज दुपारी सुटणारी एक्स्प्रेस १५ जुलैपासून धुळे स्थानकात अर्धा तास आधीच पोहोचणार आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या प्रशासनाने विशेषतः चाळीसगाव ते धुळे दरम्यानच्या सर्व स्थानकांवरील सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
धुळे येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी खान्देशातील प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने सुरूवातीला धुळे ते दादर स्थानकांदरम्यान त्रिसाप्ताहिक गाडी सुरू केली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता काही दिवसातच त्या गाडीला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत वाढविण्यात आले. दोन वर्षांपासून नियमितपणे धावत असलेली ही गाडी (११०११) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दररोज दुपारी १२ वाजता सुटते. आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचते. याशिवाय धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी (११०१२ ) धुळे येथून सकाळी ६.३० वाजता सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचते. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड स्थानकांवर दोन्ही बाजूंनी थांबे देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून धुळेसाठी दुपारी १२ वाजता सुटणाऱ्या गाडीच्या वेळेत १५ जुलैपासून काहीअंशी बदल करण्यात आला आहे. सदरची गाडी मुंबईहून ठरलेल्या वेळेतच सुटणार असली तरी सुधारित वेळेनुसार चाळीसगाव येथे १५ मिनिटे आधी म्हणजे रात्री ७.१० ऐवजी ६.५५ वाजता पोहोचेल. याशिवाय, जामदा येथे रात्री ७.३० ऐवजी ७.१५ वाजता, शिरूड येथे रात्री ८.०६ ऐवजी ७.४४ वाजता आणि धुळे येथे रात्री ८.५५ ऐवजी ८.२५ वाजता पोहोचेल. प्रवाशांना सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.