जळगाव : जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण शनिवारी ठिकठिकाणी पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी यावल तालुक्यातील पाझर तलावात बुडालेल्या एकाचा आणि जामनेर तालुक्यातील कांग नदीत बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र, जळगाव तालुक्यातील गिरणा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत लागला नाही.

गणेश गंगाराम कोळी (२७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा त्याचे आई-वडील आणि बहीण यांच्यासोबत पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्याला वाचविण्यासाठी कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणीच त्याला वाचवू शकले नाही.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत तसेच रविवारी दिवसभर गिरणा नदीच्या पात्रात शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. दुसऱ्या घटनेत जळगाव शहरालगतच्या गिरणा नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेला राहुल रतिलाल सोनार (३४, रा. वाघनगर) हा शनिवारी दुपारी चार वाजता बुडाला. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत तसेच रविवारी दिवसभर जळगाव तालुका पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. हवालदार धनराज पाटील, गुलाब माळी तपास करत आहेत.

तिसरी घटना यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिराच्या परिसरात शनिवारी दुपारी घडली. पाझर तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेला रोहिदास शिवराम लहानगे (४२, रा. खालकोट) हा प्रौढ पाय घसरून पडला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह रविवारी सकाळी ११ वाजता सापडला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे. निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर परदेशी पुढील तपास करीत आहे. चौथी घटना जामनेर तालुक्यातील सामरोद येथे शनिवारी सायंकाळी उशिरा सात वाजेनंतर घडली. संदीप सुभाष तेली (३०) हा कांग नदीत गणेश विसर्जनासाठी गेला असता बुडाला. त्यास सोबतच्या तरूणांनी तातडीने बाहेर काढले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाही. पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयसिंग राठोड करत आहेत.

पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गिरणा धरणात ९६ टक्क्यांवर पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्याने सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यांनी यापूर्वीच दिला आहे. गिरणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता संबंधित शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही गणेश विसर्जनासाठी गिरणा नदीवर गेल्यानंतर खबरदारी न घेतल्याने जळगाव तालुक्यातील दोघे पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.