नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरात टवाळखोरी, हुल्लडबाजी करणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे चालक यांना पोलिसांनी लक्ष्य केले आहे. दोन आठवड्यात सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविलेल्या मोहिमेत २२४१ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. क्षमतेहून अधिक जणांना घेऊन वाहतूक (ट्रीपलसिट) करणारे तसेच अन्य नियम मोडणाऱ्या १९२८ वाहनधारकांकडून सुमारे १३ लाखाची दंड वसुली करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही महिन्यांत शहरात घडलेल्या विविध घटनांमुळे टवाळखोर आणि हुल्लडबाजांवर कारवाईचा विषय ऐरणीवर आला होता. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई सुरू आहे. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी परिमंडळ एकच्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदार व बेशिस्त वर्तन ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. चार ते १७ सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली गेली. त्यात सार्वजनिक ठिकाणे, मोकळी मैदाने, नदीकिनारी व अन्यत्र टवाळखोर, हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> तापीच्या पुरामुळे बाधित शेतीचे पंचनामे करा; गिरीश महाजन यांची सूचना

याअंतर्गत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३१, म्हसरूळ २७६, पंचवटी २२५, सरकारवाडा ३४४, भद्रकाली ३१०, मुंबई नाका ३९३, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६२ अशा एकूण २२४१ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही टवाळखोर, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.

दुचाकीवरुन तिघांचा प्रवास

बेशिस्त वाहनधारकांविरोधातील मोहिमेत सात पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवघ्या १४ दिवसांत एका दुचाकीवरुन तिघे जण प्रवास करण्याची ७२५ प्रकरणे उघडकीस आली. हेल्मेट परिधान न करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे तसेच इतर कारणांवरून १२०३ वाहनधारकांवर या काळात कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत आडगाव पोलीस ठाणे ३६४ वाहनधारक, म्हसरूळ ३१७, पंचवटी २६१, सरकारवाडा २९६, भद्रकाली १००, मुंबईनाका ३५८ आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३२ वाहनधारकांवर १२ लाख ७० हजार ९५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangsters targets in nashik action was taken against 2241 persons within the limits of seven police stations ysh