नाशिक – आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर या अरुंद रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. महिनाभरात या रस्त्यावर तीन जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूला महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दिंडोरी परिसरातील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. पेठ रस्त्यावरील आरटीओ कॉर्नर येथे तासभर वाहतूक रोखून धरली.

आरटीओ कॉर्नर ते मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर चौक या रस्त्याचे विस्तारीकरण करून तो खड्डेमुक्त करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

पावसाळ्यात शहरातील बहुतांश रस्त्यांची बिकट स्थिती झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे लहान-मोठे अपघात, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांना नाशिककरांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने होऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अलीकडेच भाजपच्या सिमा हिरे, देवयानी फरांदे व राहुल ढिकले या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शहरातील खड्ड्यांचा विषय मांडला होता.

रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पावसाने उघडीप घेताच रस्ते दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात केली जाईल असे जाहीर केले होते. नाशिकमधील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर होण्यासाठी दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकण्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते एक-दोन वेळा नाशिकमध्ये आले. एकदा रस्ता दुरुस्तीची धावती पाहणी केली. परंतु, रस्त्यांची अवस्था बदलली नसल्याची नागरिकांची भावना आहे.

खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांमधील रोष शुक्रवारी उफाळून आला. आरटीओ कॉर्नर चौकात त्यांनी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन केले अपघातात प्राण गमावणाऱ्या हितेश पाटील, जयश्री सोनवणे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असे फलक घेऊन नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे यामुळे आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर (मुंबई-आग्रा महामार्ग) या रस्त्यावर खड्ड्यांमुळे महिनाभरात तीन जणांचे बळी गेले. या अपघातांना महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांना जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

आंदोलनात २७ वर्षीय मुलगा गमावणारे वडील निशब्द सहभागी झाले होते. त्यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर झाले. तरूण मुलगा गमावल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. मनपा प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी महिलांनी केली.

आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्ता वगळता पेठ रोड, दिंडोरी रोड आणि मुंबई:आग्रा महामार्गाला जोडणारे अन्य प्रमुख रस्ते चारपदरी झाले आहेत. दिंडोरी एमआयडीसी, गुजरातला जोडणारा मार्ग असल्याने आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंक रोड (बळी मंदिर) या मार्गाचे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे.

परंतु, रस्ता अरुंद असल्याने अपघात घडत आहे. खड्डे, साईड पट्ट्यांची दुरवस्था, वाढती वस्ती पाहता या मार्गाचे भमेळा निधीतून विस्तारीकरण करावे आणि तो खड्डेमुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे महापालिकेकडे केली आहे. आंदोलनात सुनील निरगुडे, रवी गायकवाड, प्रवीण जाधव. योगेश जाधव, संतोष पेनमहाले., राजू देसले, विशाल कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.