जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे, घरांचे आणि पशुधनाचे अतोनात नुकसान झाले असताना, शासन निकष लावून मदत देण्याचे नाटक करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही निकषांशिवाय संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने येथे शुक्रवारी देण्यात आला.
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे अशात शासनातर्फे निकष लावण्याचे काम सुरू असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केले. केवळ चार तालुक्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीचा लाभ न देता उर्वरित ११ तालुक्यांत देखील ओला दुष्काळ जाहीर करावा, याकडे लक्ष वेधण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक विकास पवार, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, जगतराव पाटील, सचिन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपमहा ृनगर प्रमुख प्रशांत सुरळकर, मजहर पठाण, रमेश पाटील, विश्वनाथ पाटील, वाय. एस. महाजन, लक्ष्मण पाटील, भिका पाटील, संजय पाटील, एन. डी. पाटील, राजेंद्र पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनाचा आशय असा
शासनाने जारी केलेल्या निर्णयामध्ये जळगाव जिल्ह्यातील केवळ काही निवडक तालुक्यांनाच मदतीच्या निकषात समाविष्ट केले आहे. प्रत्यक्षात अतिवृष्टी, नद्यांचे पूर आणि ढगफुटीमुळे संपूर्ण जिल्ह्याला जबरदस्त फटका बसला आहे. कपाशी, सोयाबीन, केळी, मूग, उडीद, ज्वारी, मका यांसारखी बरीच पिके अतिवृष्टीमुळे पूर्णतः नष्ट झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे उरलेले अवशेषही वाचलेले नाहीत. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पुन्हा पेरणी करणेही अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण बिघडले असून, अशा स्थितीत तत्काळ ठोस आर्थिक मदतीची गरज आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे