नाशिक: तापमानाने ४२ अंशाचा टप्पा गाठला असताना दुसरीकडे मेच्या उत्तरार्धात नाशिक विभागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. सध्या पाच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ७१३ गावे आणि २४४८ वाड्या अशा एकूण ३१६१ गाव-वाड्यांना ७७८ टँकरम धून पाणी पुरवठा करावा लागत आहे. गावांसाठी २०८ तर टँकरसाठी २४३ अशा एकूण ४५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यास टंचाईची सर्वाधिक झळ बसली असून नंदुरबार जिल्ह्यात कुठेही टँकरची गरज भासलेली नाही. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत. विभागातील सुमारे १५ लाख लोकसंख्येची टँकरवर भिस्त आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून मे महिन्यात विभागातील टंचाईचे संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या ३२० गावे आणि ८२४ वाड्यांमध्ये ३५२ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात लहान-मोठे २४ हून अधिक धरणे आहेत. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील शेकडो गावे-वाड्या पाणी टंचाईला तोंड देत आहेत. १२ तालुुक्यात टँकर सुरू असून दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि निफाड हे तीन तालुके त्यास अपवाद आहेत. या जिल्ह्यात गावांची तहान भागविण्यासाठी ४९ तर, टँकरसाठी १३३ अशा एकूण १८२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

हेही वाचा : धुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज उत्खनन

खान्देशातील जळगावमध्ये ७८ गावांना ९७ टँकरने पाणी पुरविले जात आहे. यात जळगाव, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, रावेर या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या जिल्ह्यात गावांसाठी ९५ तर टँकरसाठी ५९ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जळगावमधील दोन लाख ३१ हजार ४२३ नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त आहे. धुळे जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी चार गावात एकूण आठ टँकरने पाणी दिले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नसल्याचे अहवालावरून दिसते. कारण या जिल्ह्यात ना कोणत्या गावात टँकर आहे, ना विहीर ताब्यात घेतलेली आहे. विभागात या जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता बरीच कमी आहे. नगर जिल्ह्यात ३०७ गावे व १६२४ वाड्या अशा एकूण १६२४ ठिकाणी ३२१ टँकरने पाणी पुरविले जात आहे. या जिल्ह्यात गावांची तहान भागविण्यासाठी ६४ आणि टँकरसाठी ४३ विहिरींचे अधिग्रहण झाले. पाच लाख ९७ हजारहून अधिक लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे.

हेही वाचा : अहमदनगर जिल्ह्यातील बचाव कार्यात बोट उलटून धुळे आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन जवानांचा मृत्यू

नाशिकची स्थिती

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ३४० गाव-वाड्यात ६९ टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्या खालोखाल येवला तालुक्याचा क्रमांक असून तिथे ११८ गाव-वाड्या ५६ टँकरच्या मदतीने तहान भागवत आहेत. बागलाण तालुक्यात ४६ गाव-वाड्या (४१ टँकर), चांदवड १०० (३१ टँकर), इगतपुरी ३३ (सात), देवळा ६२ (३३), मोगाव १२७ (४६ टँकर), नाशिक एक गाव (एक), पेठ १६ (११), सुरगाणा ३३ (१६), सिन्नर २४६ गाव-वाड्या (४० टँकर), त्र्यंबकेश्वर एक गाव (एक टँकर) अशी स्थिती आहे.

हेही वाचा : नाशिक तापले; पाच वर्षानंतर नाशिकचा पारा पुन्हा ४२ अंशावर

विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात सहा लाख एक हजार ५१९ लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर धुळे जिल्ह्यात हे प्रमाण ८४ हजार ९८० इतके आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ३१ हजार ४२३ नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. नगर जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार ३६२ लोकसंख्येची तहान टँकर भागवत आहे.