धुळे: शिरपूर तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात स्टोन क्रशर उभारून गौण खनिज उत्खनन करुन वन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धुळे वनवृत्तच्या वन संरक्षक म्हणून धुळ्यात रुजू होताच निनू सोमराज यांनी ही कारवाई केली आहे. मनोज जाधव (रा. शिरपूर) असे या संशयिताचे नाव आहे. या कारवाईत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्र, खासगी वाहन आणि अन्य साधने जप्त केली. धुळे वनवृत्तच्या वनसंरक्षक निनू सोमराज आणि उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

धुळे वनविभागातील शिरपूर वनक्षेत्रात असलेल्या वाडी गावच्या परिमंडळात निमझरी (ता. शिरपूर) क्षेत्र आहे. यातील कक्ष क्रमांक ९३५ मध्ये जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उत्खनन करुन झाडे, झुडपे मुळासकट उपटण्यात येत असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. उत्खननामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाहही बदलत गेला. या प्रकाराची नोंद घेत वन अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली.

हेही वाचा : अहमदनगर जिल्ह्यातील बचाव कार्यात बोट उलटून धुळे आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन जवानांचा मृत्यू

या ठिकाणी आढळलेले जेसीबी यंत्र ताब्यात घेतले. दक्षता विभागाचे विभागीय वनअधिकारी राजेंद्र सदगीर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. तपास पथक घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मनोज जाधव याने खासगी वाहनातून येत शासकीय कामकाजात हुज्जत घालून अडथळा निर्माण केला. वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता संबंधित जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मुळासकट उपटलेल्या सागवानचे लाकूड गाडीच्या मागच्या डिकीत ठेवल्याचे निदर्शनास आले. नऊ मे रोजी ही कारवाई झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे अधिकाऱ्यांनी वाहन आणि जेसीबी ताब्यात घेतले. निमझरी येथील वनरक्षकाने जाधव विरुद्ध भारतीय वन अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : नाशिक तापले; पाच वर्षानंतर नाशिकचा पारा पुन्हा ४२ अंशावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईत जेसीबी यंत्र, वाहन आणि सागवान असा मुद्देमाल जप्त केला. २१ मे रोजी संशयित जाधव यास अटक करून घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले असता संबंधित खडी स्टोन स्क्रेशर हे जाधव याच्या मालकीचे असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. महसूल क्षेत्रालगत असलेल्या वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या हद्दीतील दगडी स्तंभ नष्ट करून मोठे नुकसान केले गेले आहे. २२ मे रोजी संशयित जाधव यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास वन कोठडी सुनावली. ही कारवाई वन अधिकारी (दक्षता) आर. आर. सदगीर, सहायक वनसंरक्षक मंगेश कांबळे, काशिनाथ देवरे, कि.म. गिरवले, व्ही. एस. गिते, दीपिका पालवे यांच्या पथकाने केली.