नाशिक – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांच्या जिवावर आपण निवडणुका लढलो. आता त्यांच्यासाठी कार्यकर्ता होऊन निवडणुकीचे काम करायला हवे. निवडणुका कशा जिंकायच्या हे आम्हांला माहिती आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासासाठी मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

रविवारी येथे शिंदे गटाचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

आगामी निवडणुकांमध्ये महायुती की स्वतंत्र याचा विचार करू नका. कोण कोणाशी महायुती, कोण कोणाशी आघाडी करत आहे. कोणाचे मनोमिलन होत आहे, त्याचा हिशेब माझ्याकडे आहे. तुम्ही केवळ आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा. मतदार याद्यांमध्ये कोणाची नावे नाहीत ते शोधा, याद्या अद्यावत करा, त्यात चुका नको. निवडणुकांसाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मंत्री, अधिकारी, पदाधिकारी येतील, त्यांना खरी माहिती द्या. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आमच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले आता आपण सर्वांनी कार्यकर्त्यांसाठी काम करावयास हवे, असे शिंदे यांनी व्यासपीठावर उपस्थित मंत्री, पदाधिकाऱ्यांना बजावले. महायुतीच्या कोणत्याही नेत्याविषयी वक्तव्य करु नका, कुठल्याही नेत्याचा अवमान करू नका, असे आवाहन शिंदे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, विजय करंजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खड्डेमुक्तीकडे लक्ष, गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

नाशिक शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी काम करण्यात येईल. शहर खड्डेमुक्तीच्या कामात कोणी अधिकारी जर टाळाटाळ करीत असेल तर त्याचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. यासंदर्भात आपण महापालिका आयुक्तांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराविरुध्द शिवसेनेची महिला आघाडी कशी कार्यरत आहे, याचे उदाहरण शिंदे यांनी दिले. परंतु, काही महिन्यांपासून नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीचा त्यांनी उल्लेखही केला नाही.