जळगाव – जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. विरोधकांनी त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ वाया न घालवता थेट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता सत्ताधारी भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ओल्या दुष्काळाची मागणी करून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जळगावात नैसर्गिक आपत्तीमुळे केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. असंख्य जनावरे दगावली असून, गोठे व चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. बरेच नागरिक वाहुन गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, देवाभाऊ पंचनाम्याचे सोपस्कार आणि निकषांचे खेळ न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करा, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे.

निवडणूक काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने कोणतेही कागदपत्र किंवा पात्रतेची तपासणी न करता थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसानीची मदत न देता पंचनामे, विविध अटी आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली विलंब केला जात आहे, याकडे आमदार खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

अतिवृष्टीसह पुरामुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. तरी सुद्धा शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळू शकलेली नाही. पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक निकष लावले जात असल्याने परिणामी ज्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे. किंवा त्यांना मदतच मिळणार नाही. म्हणून पंचनामे करत असतांना ३३ टक्के पीक नुकसानीचा निकष काढून शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण शेती क्षेत्राला तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुद्धा आमदार खडसे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप किसान मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी केली. जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वादळासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कपाशी, मका, केळी, सोयाबीन, ऊस, फळबाग व कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमिनीचा पृष्ठभाग खरडून गेला. घरांची मोठ्या प्रमाणाच पडझड झाली. नदी व नाल्यांना पूर आल्यामुळे पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले.

अनेक ठिकाणी बांध बंदिस्ती फुटून शेती पूर्णपणे उध्वस्त झाली. ही स्थिती लक्षात घेता तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. बेघर झालेल्या नागरिकांना तातडीने घरे आणि जीवनावश्यक वस्तू तसेच कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा. अतिवृष्टीमुळे निर्माण झाली स्थिती लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. केळी पिकाला हमीभाव द्यावा, अशा काही मागण्या भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, किसान मोर्चाचे पदाधिकारी पोपट भोळे, सुरेश धनके, विजय पाटील, राजेंद्र सोनवणे, विजय महाजन, देवेंद्र पाटील, राहुल महाजन, मनोज पाटील आदींनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.