जळगाव – सध्या आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज सुरू होणार आहे. तर दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. दिवाळीच्या काळात विशेषतः अहमदाबाद विमानसेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवासह पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. पैकी मुंबईसाठी अलायन्स एअर कंपनीकडून आतापर्यंत आठवड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जात होती. मात्र, प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर २६ ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे मुंबईसाठी दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे. जळगाव आणि मुंबई या शहरांमधील प्रवास आणखी सोयीस्कर आणि वेगवान होऊ शकणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी ७:१० वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री ८:२५ वाजता जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री ८:५० वाजता विमान उड्डाण घेईल. आणि मुंबई विमानतळावर रात्री १०:१० वाजता पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावहून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल. ज्याचा लाभ प्रवासी नियमितपणे घेऊ शकतील.
याशिवाय, जळगाव विमानतळावरून आठवड्यातून चार दिवस सायंकाळी ७:२० वाजता अहमदाबादसाठी विमान उड्डाण घेईल. ही सेवा जळगावहून रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू असेल. तर अहमदाबाद विमानतळावरून आठवड्यातून चार दिवस दुपारी ५:४० वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि सायंकाळी ६:५५ वाजता जळगाव विमानतळावर पोहोचेल. अहमदाबादहून ही सेवा रविवार, मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी सुरू असेल.
क्षमता वाढविण्यासाठी पाठपुरावा
जळगाव शहरातील विमानतळाचा विस्तार आणि सुविधा वाढविण्याबाबत खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. धावपट्टीच्या लांबीत वाढ करण्यासह विमानसेवेच्या फेऱ्या आणि एकुणच विमानतळाची क्षमता वाढविण्याच्या मागणीकडे त्यांनी केंद्राचे लक्ष वेधले होते. त्यानुसार, विमानतळाचा कृती आराखडा आता अंतिम टप्प्यात असून, भविष्यात टर्मिनल आणि एप्रन उत्तरेकडे हलविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात प्रवासी संख्या आणि विमानसेवेच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार विमानतळाचा आणखी विस्तार करण्याची तयारी मंत्रालयाने दर्शवली आहे. विशेष म्हणजे सध्या कोणत्याही एअर लाइनकडून अतिरिक्त उड्डाणांसाठी प्रस्ताव आलेला नसला, तरी भविष्यात मागणी आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही नागरी विमानन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
