जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव शहराभोवती प्रस्तावित ४० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर होऊन आता बरीच वर्षे उलटली आहेत. प्रत्यक्षात रिंग रोड फक्त कागदावरच असल्याने राज्य मार्गाचा दर्जा असलेल्या या रस्त्याची अवस्था सध्या एखाद्या ग्रामीण मार्गापेक्षाही वाईट झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावापासून सुरू होणारा रिंगरोड फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी, सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीशी जोडण्यात येणार होता. पाळधीपासून सावखेडापर्यंत एकूण नऊ गावांना जोडणारा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा हा रस्ता तयार करण्याची योजना होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षणही केले होते. त्याच प्रमाणे प्रस्तावित रिंग रोडवरील गावांच्या जुन्या रस्त्यांना जोडणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक ३८ ची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यानंतर रिंग रोडचा विषय आता बाजुला पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रिंग रोडसाठी प्रस्तावित रस्त्याचा कायापालट करण्यासाठी इतक्या वर्षात कोणतेच पाऊल उचललेले नाही. परिणामी, या रस्त्याची पूर्वी होती तशीच किंबहुना आणखी जास्त वाईट अवस्था नंतरच्या कालखंडात झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने मोठे खड्डे पडून डांबरीकरणाची अक्षरशः वाट लागली आहे. थोडाही पाऊस झाला तरी खचलेल्या रस्त्यावर लगेच पाण्याची डबकी साचत असल्याने पावसाळ्यात त्यावरून वापरणे खूपच जिकिरीचे ठरत आहे. पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी स्वारांचे अपघात त्यामुळे झाले आहेत. शेतीमालाने भरलेली वाहने सुद्धा खोलगट रस्त्यातून जाताना उलटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात वाळुने भरलेली ट्रॅक्टरसारखी भरधाव वेगाने वापरत असल्याने या राज्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

फुपनगरी-ममुराबाद-आसोदा-तरसोद या गावांदरम्यानचा जुना वहिवाटीचा रस्ता राज्य मार्गाच्या दर्जाचा असला, तरी त्याची दुर्दशा बघता तो आता ग्रामीण मार्ग सुद्धा वाटत नाही. या रस्त्याच्या साईडपट्ट्या कधीच गायब झाल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे व झुडपांचे रान वाढले आहे. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षरशः वाळीत टाकल्याचे दिसून येत आहे. एकही अधिकारी रस्त्याच्या पाहणीसाठी कधीच फिरकताना दिसलेला नाही. देखभाल आणि दुरुस्तीचे मग विचारायलाच नको. या मार्गावरील लौकी नाल्यालगतच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, पुलाच्या जोड रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण अजुनही केलेले नाही. पावसाळ्यात लौकी नाल्यास पूर आल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनधारकांचे अतोनात हाल होतात.