नाशिक : राज्यात कुठेही मोर्चा असो, आंदोलन असो किंवा अन्य काही प्रश्न. आपले काम एकच एरंडोली करायची. म्हणजे आंदोलक, निदर्शनकर्ते यांच्याशी चर्चा करायची. त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. मुख्यमंत्र्याबरोबर बैठक घ्यायची आणि त्यातून मार्ग काढायचा. याला एरंडोली म्हणजे मध्यस्थी म्हणतात, अशी मंत्री गिरीश महाजन यांनी व्याख्या सांगत भाजपमधील आपले महत्वही अधोरेखीत केले.

येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कामगार मेळाव्यात महाजन यांनी मार्गदर्शन केले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे चळवळीतील नेते आहेत. जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली असून तुमच्या डोक्यावर येऊन बसलेले ते नेते नाहीत. मातीशी त्यांचे नाते आहे, असे महाजन यांनी सांगितले. मेळाव्यातील मागण्यांबाबत पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांशीही बोललो. मेळाव्याला येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली. मेळाव्यात काय बोलु, असे विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी, जे देता येईल तेवढेच बोल. अवास्तव बोलु नको, अशी सूचना केल्याचे महाजन यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

राज्य परिवहन महामंडळ ही वाहतूक व्यवस्था संपूर्ण देश जोडण्याचे काम करते. एसटी नसती तर काय झाले असते ? एसटी अखंडपणे धावत आहे. ग्रामीण भागाचा आत्मा तर शहराची ही रक्तवाहिनी आहे. त्यामुळे तुमच्या मागण्या मान्य होणे आवश्यक आहे. अनुकंपा तत्वावर भरती असो, महामंडळातील रिक्त पदे असो, शासनाकडे मंडळ विलगीकरण असे वेगवेगळे प्रश्न आहेत. सर्व मागण्या मान्य होतील, असे नाही. परंतु, सरकार याविषयी सकारात्मक आहे.

तसेही पडळकरांवर फडणवीस यांचे विशेष प्रेम आहे. चळवळीतील असल्याने ते आक्रमक होतात. इतके की त्यांना सांगावे लागते, दमाने घ्या. ते चळवळीतील, जनमासामान्यांमधील आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी ओरड करणाऱ्यांचे पुतनामावशीचे प्रेम आहे. तुमच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेऊ. तुमच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढु, असे आश्वासन महाजन यांनी दिले.