नाशिक :सरकार राज्य परिवहन महामंडळाच्या बाजूने ठाम आहे. सरकारने महामंडळाला १८०० नवीन बसेस दिल्या. कर्मचारीही वाढवायला हवेत, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

येथे रविवारी आयोजित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात पडळकर यांनी मार्गदर्शन केले. कर्मचारी संख्या वाढविणे तसेच महामंडळाची स्थिती सुधारणे गरजेचे आहे. तत्कालीन मान्यताप्राप्त संघटना असतांना १२४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही संघटनेत काम सुरू केल्यापासून ही संख्या दोन ते तीनवर आली आहे. मागण्या मान्य होतील. पण. कामगारांनी संघटित रहायला हवे.

महामंडळाच्या बँकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्या ठिकाणी आपल्या लोकांनी काम करायला हवे, असा सल्ला पडळकर यांनी दिला. राज्य शासनाने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा केला. महामंडळाकडून श्वेतपत्रिकेत ८९९ कोटी रुपये इतर खर्च दाखवला जात आहे. हा इतर खर्च म्हणजे काय हे महामंडळाने स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पडळकर आणि खोत यांचा एसटीशी काय संबंध, असा विरोधक प्रश्न करतात. एसटी महामंडळ विरोधात आंदोलन करण्याआधी सहा महिने सर्व अभ्यास केला. कर्मचाऱ्यांच्या अडचणी, त्यांची होणारी पिळवणूक समजून घेतली. त्यांचे प्रश्न आपले वाटले म्हणून आम्ही दाेघे लढा देत आहोत. आंदोलन करतो. मान्यताप्राप्त संघटनांना जे जमले नाही, ते आम्ही करून दाखवले. ५०००, ४००० आणि अडीच हजार रुपये अशी पगारवाढ आम्ही मिळवून दिली.

चालकांना ढाब्यावर जेवण, निवास व्यवस्था असे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यावर काम सुरू आहे. मागण्या मान्य होतील. परंतु, संघटित व्हा, असा सल्ला त्यांनी दिला. महामंडळाच्या बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्या ठिकाणी आपल्यातील काही लोकांनी लक्ष द्यायला हवे. आता चालक आणि वाहक सुशिक्षित झाले आहेत. निर्व्यसनी वाहनचालक असल्याने प्रश्न सुटण्यास मदत होईल. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी मुख्यंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पडळकर यांनी दिले.