नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या प्रचंड गोंधळात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विद्यापीठ स्थापनेच्या विषयावरून विद्यमान अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले आणि सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडून परस्परविरोधी दावे होत आहेत. अध्यक्षांनी मविप्र विद्यापीठ स्थापनेचा विषय नामंजूर केल्याचे जाहीर केले तर, सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावास आवाजी बहुमताने सभासदांनी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे.

मविप्र संस्थेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी तुकारामजी रौंदळ सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरचिटणीस ॲड, नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विद्यापीठ स्थापण्याच्या विषयावरून सत्ताधारी ॲड. ठाकरे आणि विरोधी नीलिमा पवार यांच्या गटात दुफळी निर्माण झाल्यामुळे ही सभा वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट होते. सभेपूर्वी दोन्ही गटांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. सभेत लेखापरीक्षण आणि स्वायत्त विद्यापीठाच्या मुद्द्यावरून गदारोळ उडाला.

लेखापरीक्षक बदलण्याला मंजुरी दिल्यानंतर ‘मविप्र विद्यापीठ’ स्थापनेचा प्रस्ताव मांडला गेला. त्याचवेळी सभासदांकडून गोंधळ सुरू झाला. वाद वाढत असल्याने अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी हा विषय फेटाळल्याचे सांगून सभा संपल्याचे जाहीर केले. अध्यक्षांनी या विषयावर कुठलीही चर्चा होऊ दिली नाही. त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी केला. त्यानंतर लगेचच प्रतिसभा झाली. सभासदांनी मविप्र विद्यापीठ प्रस्तावास मंजुरी देत, सभासदांच्या भल्यासाठी हे विद्यापीठ झालेच पाहिजे असे आवाजी मताने मंजूर करण्यात आल्याचे ॲड. ठाकरे यांनी म्हटले आहे. तर सभेचा अध्यक्ष या नात्याने विद्यापीठाचा विषय फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले असून संस्थे संदर्भात हा विषय संपल्याचे ॲड. ढिकले यांनी सांगितले.

संभ्रम दूर करण्यासाठी समिती

मविप्र विद्यापीठ प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याआधी कार्यकारिणीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली जाईल. त्याद्वारे विद्यापीठाच्या आर्थिक बाबी, पात्रता आणि विद्यापीठाचे मविप्र संस्थेकडे असलेले स्वामित्व याबाबतीत सभासदांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात येणार आहे.

खाद्य पदार्थांची फेकाफेक

मविप्रच्या सभेत चांगलाच गदारोळ झाला. सभासदांना खाद्य पदार्थांची पाकिटे दिली गेली. त्याचाही वेगळ्या पद्धतीने गोंधळासाठी वापर झाला. गर्दीत लाडू, कचोरी, पाण्याच्या बाटल्या व्यासपीठाच्या दिशेने भिरकावल्याचे पहायला मिळाले. दादागिरीच्या बळावर सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला.निफाड तालुक्यातील एक सभासदाला कमरेला पिस्तुल लावून आणले गेले्. गुंड प्रवृत्तीचे लोक आणून विरोधी गटाने बिहारसारखी स्थिती निर्माण केल्याचा आरोप सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केला. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.