मनमाड : नागपूर -पुणे या मनमाड मार्गे दररोज धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटन झाल्यानंतर अल्पावधीत १३४ टक्के जादा उत्पन्न देत मध्य रेल्वेची प्रवासी प्रिय रेल्वे ठरली आहे. देशात धावणाऱ्या वंदे भारतचे आजवरचे सर्व विक्रम या गाडीने मोडीत काढले. अवघ्या दोन दिवसांत प्रतिक्षा यादी देण्याचा इतिहास घडवला.
संपूर्ण भारतभर दररोज १३० वंदे भारत धावत असून सुरू झाल्यानंतर दोनच दिवसात १८. ६ लाखांचे उत्पन्न देणारी आणि प्रारंभीच्या दोन दिवसातच प्रतिक्षा यादी गाठणारी ही भारतातील पहिली वंदे भारत ठरली आहे. विशेष म्हणजे खासगी वातानुकूलीत शयनयान सुविधा असणाऱ्या बसच्या तीनपट जादा भाडे असणारी दिवसाच्या बारा तासात ८८१ किलोमीटर प्रवास करणाऱ्या या गाडीला प्रतिसाद मिळेल किंवा नाही, याबाबत वरीष्ठ रेल्वे अधिकारीही साशंक होते. परंतु उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच तिने प्रवासी लोकप्रियता व उत्पन्नाचेही आजवरचे रेल्वेचे विक्रम मोडून भारतीय रेल्वेच्या वंदे भारत रेल्वेच्या इतिहासात अग्रभागी येण्याचा मान पटकावला आहे.
सध्या या गाडीला खुर्चीयानचे आठ बोगी व विशेष आरामदायी बैठक व्यवस्थेच्या एक बोगी अशी एकूण ५३० प्रवाशांची क्षमता आहे. या गाडीचे नागपूर-पुणे खुर्चीयानचे भाडे २०२० रुपये तर व विशेष आरामदायी बैठक व्यवस्था असणाऱ्या बोगीत भाडे ३०८० असून १२ तासांत ती पोहचते. नागपूरहून सकाळी ९.५० ला निघणारी वंदे भारत रात्री ९.५० वाजता पुण्याला पोहचते तर पुण्याहून सकाळी ६.२५ ला निघून सायंकाळी ६.२५ ला अजनी येथे दिवसाच्या प्रकाशात अवघ्या १२ तासात पोहचणारी ही रेल्वे आहे.
या वंदे भारत गाडीची ११ ऑगस्टला सुरूवात झाली. तिने १२ ऑगस्टला आठ लाख ९६ हजार ६३२ रूपये तर १३ ऑगस्टला नऊ लाख ६४ हजार ८० रूपये अशी दोन दिवसांत एकूण १८ लाख ६० हजार ७१२ रूपयांची कमाई मध्य रेल्वेला करून दिली. प्रवासी प्रियतेत तिने जोरदार मुसंडी मारली. सुरूवातीलाच दोन दिवसांची प्रतिक्षा यादी रेल्वेला दिली आहे. त्यामुळे अधिकारी आता या गाडीचे डबे वाढवून अधिक प्रवासी क्षमता करण्याच्या विचारात आहेत.
प्रतिक्षा यादी…
२६१०२ अजनी-पुणे वंदे भारत रेल्वेत १५ ऑगस्ट रोजी खुर्चीयान बोगीत१६, आरामदायी आसन व्यवस्थेच्या बोगीत दोन, १६ ऑगस्ट रोजी खुर्चीसाठी ४७, आरामदायी आसन व्यवस्था चार, आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी खुर्ची यानसाठी ११४, आरामदायी आसन व्यवस्थेसाठी १९ अशी प्रतिक्षा यादी होती.