नंदुरबार : अमृत भारत योजनेतंर्गत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामधील ब्रम्हपूर आणि रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरातमधील उधना येथे हिरवा झेंडा दाखवून सुरु केलेल्या उधना – ब्रम्हपूर दरम्यानच्या अमृत भारत एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी नंदुरबार रेल्वे स्थानकात येण्यास तब्बल दोन तास उशीर झाल्याने किमान यापुढे तरी अमृत भारत एक्स्प्रेसने वेळ पाळावी, अशी अपेक्षा नंदुरबारकरांनी व्यक्त केली आहे.
सुरत – जळगाव दरम्यानच्या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पहिल्या अमृत भारत एक्स्प्रेसचे शनिवारी नंदुरबारमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुजरातमधील उधनापासून ओदिशातील ब्रम्हपूरपर्यंत आठवड्यातून दर रविवारी धावणाऱ्या या रेल्वेला ओदिशातील ब्रम्हपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर उधना येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखविला. या मार्गावरील ही पहिली अमृत भारत एक्स्प्रेस असल्याने तिला पाहण्यासाठी आणि तिचे स्वागत करण्यासाठी सर्वामध्येच उत्सुकता होती. दुपारी एक वाजून १० मिनिटांनी ती नंदुरबार रेल्वे स्थानकात येणे अपेक्षित होते. त्यामुळे नंदुरबार स्थानकात स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती.
सकाळी ११ वाजेपासूनच के. आर. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना याठिकाणी बोलावून ठेवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी सुरवातीला गणेशवंदना आणि स्वागत गीत सादर केले. नंतर पथनाट्याच्या माध्यमातून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबात जनजागृती देखील केली. मात्र सकाळी ११ वाजता आलेल्या या शालेय विद्यार्थ्यांना अमृत भारत एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी तब्बल तीन वाजेपर्यत ताटकळावे लागले. एक वाजता येणारी ही एक्स्प्रेस उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल दोन तास उशीराने दाखल झाली. यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी फुलांचा हार घालत लोको पायलटांचे स्वागत केले. नंदुरबार रेल्वे स्थानकातही अमृत भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
उधना येथून दर रविवारी सकाळी १०.५० मिनिटीनी निघणारी अमृत भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील नवापूर, नंदुरबार, दोडाईंचा ,शिंदखेडा, अंमळनेर, धरणगाव, पाळधी, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया या रेल्वे स्थानकांवर थांबे घेणार आहे. उदघाटनाच्या दिवशी एक्स्प्रेस संपूर्ण फुलमाळांनी सजवविण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेत एक्स्प्रेसचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, महामंत्री सदानंद रघुवंशी, रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्या संजय शहा, मोहन खानवानी, सुहास नाईक यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे ही एक्स्प्रेस वेळेवर धावावी, एवढीच माफक अपेक्षा या मार्गावरील रेल्वे प्रवासी व्यक्त करीत आहेत.