नाशिक – शहर परिसरातील गुन्हेगारी आता थेट नागरिकांच्या दारात आल्यामुळे आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमिवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरुध्द मकोका, एमपीडीएची कारवाई करण्यात येत आहे. परिमंडळ एक अंतर्गत शहरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्हेगारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, चोरी, दुखापत करणे, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे असलेल्यांविरुध्द कारवाई करण्यात येत आहे.
आकाश गरड (३०, रा. पंचवटी), युवराज वाघिले (१९, रा. भद्रकाली), अर्जुन लोट (२७, रा. आडगाव नाका), सागर कुमावत (३३, शितळादेवी चौक), ऋषिकेष पगारे (२८, रा. जुने नाशिक), तुषार काळे (२१, रा. मोदकेश्वर मंदिर), करण लोट (२१, रा. महालक्ष्मी चाळ), रोहित राठोड (२४, रा. शिवनेरी झोपडपट्टी), आतिश बोडके (२३, रा. फुलेनगर), सागर ताते (३४, रा. भद्रकाली), शोएब शेख (२२, रा. पिंपळचौक) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत २५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांविरूध्द अशी कारवाई अधिक जोमाने करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी उपायुक्त मोनिका राऊत यांनी भूमिका मांडली. सण, उत्सव तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात येत आहे.
परिमंडळ एक अंतर्गत पंचवटी पोलीस ठाणे येथील दोन तर भद्रकाली पोलीस ठाण्याकडील नऊ सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्यावर दोनपेक्षा अधिक गुन्हे आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.