नाशिक – राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उडालेला गदारोळ आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.

मविप्र विद्यापीठ स्थापनेवरून दोन गटात दुफळी निर्माण झाली होती. सभेत मोठा गोंधळ उडाला. काहींनी खाद्यपदार्थांच्या पिशव्या फिरकावल्या. यावेळी उन्मेष डुंबरे ही व्यक्ती कमरेला बंदूक लावून साथीदारांसह व्यासपीठावर चढली होती. सभासदांमध्ये दहशत निर्माण करून गोंधळ घातला. शैक्षणिक संस्थेच्या सभेत बेकायदेशीरपणे बंदूक घेऊन दहशत निर्माण केल्या प्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पोलिसांकडे केली आहे.

मविप्र संस्थेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरचिटणीस ॲड, ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मविप्र विद्यापीठावरून सत्ताधारी ॲड. ठाकरे आणि विरोधक नीलिमा पवार यांच्या गटात दुफळी निर्माण झाली होती. याचे पडसाद सभेत उमटले होते. काहीनी खाद्य पदार्थाच्या पाकिटातील लाडू, कचोरीसह पाण्याच्या बाटल्या व्यासपीठाच्या दिशेने भिरकावल्या होत्या.

एक जण कमरेला बंदूक लावून आल्याचे दिसले होते. गोंधळात सभेचे कामकाज आटोपले. अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी मविप्र विद्यापीठ स्थापनेचा विषय नामंजूर केल्याचे तर, सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावास बहुमताने सभासदांनी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थेच्या सभेत बंदूक घेऊन येणे, जमाव आणून गोंधळ घातल्याप्रकरणी संशयित उन्मेष डुंबरे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

सभेत पत्रिकेतील एक ते सात या विषयांवर चर्चा झाल्यानंतर मविप्र विद्यापीठ स्थापण्याच्या विषय चर्चेसाठी घेण्यात आला. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून सभा उधळून लावण्याच्या इराद्याने डुंबरे जमावाला घेऊन व्यासपीठावर चढला. त्याने सभासदांना दिसेल, अशी कमरेला बंदूक लावलेली होती. विषय क्रमांक आठ चर्चेवर येताच संबंधितांनी गोंधळ घातला. बंदुकीचे प्रदर्शन करुन सभासदांमध्ये दहशत नि्र्माण केली. यामुळे अनेक सभासद चर्चेत व सभेच्या पुढील कामकाजात सहभागीही झाले नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी

संशयित उन्मेष डुंबरे याने अनाधिकाराने व बेकायदेशीरपणे सभास्थळी येऊन दहशत निंर्माण करणे, घोषणाबाजी, हुल्लजबाजी करणे हे कृत्य फौजदारी गुन्हा आहे. संशयित भविष्यात शस्त्रास्त्राचा वापर करून गंभीर गुन्हा करण्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. डुंबरे याच्याकडे शासन शस्त्र परवाना आहे का, याची तपासणी करावी. शस्त्र परवाना असल्यास त्याचा दुरुपयोग करून शैक्षणिक संस्थेच्या सभेत दहशत निर्माण केल्याप्रकरणी शस्त्र परवाना रद्द करावा, अशी मागणी ॲड. ठाकरे यांनी पोलिसांकडे केली आहे.