नाशिक – अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरातील अन्नधान्यही भिजले आहे. बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यासाठी ज्या भागात नुकसान झालेले नाहीत, तेथील अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात कार्यरत केले जाईल असे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात चार मंत्री असूनही एकही शेतीच्या बांधावर गेले नसल्याची भावना शेतकरी वर्गातून उमटू लागली. मंत्री भुजबळ यांच्यासह अन्न व औषध प्रशासन मंत्री नरझरी झिरवळ यांनी विविध भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. दादा भुसे आणि माणिक कोकाटे हे दोन मंत्री कुठे होते, याची स्पष्टता झाली नाही.
मंत्री भुजबळ यांनी येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, वाघाळे आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. नुकसानीचे मोहीम स्तरावर पंचनामे करून एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये, असे त्यांनी सूचित केले. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत केली जात आहे.
बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत सुरू केली गेली असून प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आवश्यक तिथे आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सेवाही पुरविल्या जात आहे. अतिवृष्टीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’ अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.
नरहरी झिरवळ पेठमध्ये
पेठ तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासन स्तरावर बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असून बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिल्या. पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव भूवन आदी गावात त्यांनी थेट शेतात जाऊन नागली, वरई, भात, उडीद, वाल या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी व अहवाल सादर करावा. सततच्या पावसाने शेतपीक ऐन फुलोऱ्यात असतांना अतोनात नुकसान झाले. पिकांवर करपा रोगाचा प्रार्दूभाव वाढला आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केली.