नाशिक – पंचवटीत इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेत निष्काळजीपणा दाखविल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दुसरीकडे खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याचा ठपका ठेवत महानगरपालिकेने विहान पार्टनरशीप फर्मला नोटीस बजावली आहे.

विडी कामगार नगर भागात दी व्ही पार्क या नावाने बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. इमारतीच्या पायासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. बांधकाम व्यावसायिकाने या ठिकाणी सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नसल्याचा आरोप करीत स्थानिकांनी संबंधितावर कारवाईसाठी सोमवारी आंदोलन केेले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांतील कलमात बदल करण्यात आले.

बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा असे कलम यात समाविष्ट करण्यात आले. या प्रकरणात आडगाव पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया (सिडको) आणि आकाश गायकवाड (पेठरोड) यांना नोटीस बजावून चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या नगर नियोजन विभागालाही जाग आली. त्यांनी विहान पार्टनरशीप फर्मला नोटीस बजावत बांधकाम परवानगीतील अटींचे उल्लंघन झाल्याकडे लक्ष वेधले. ही घटना अतिशय गंभीर असून जीवितहानी होण्यास तुम्हीच सर्वस्वी जबाबदार आहात, खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचा ठपका ठेवला.

बांधकाम परवानगीचे पालन न केल्यावरून पुढील कारवाई का करू नये, याबाबत पाच दिवसात खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खोदलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश नगर नियोजन विभागाने दिले आहेत.