नाशिक – महिला सक्षमीकरणासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होत असतांना सामाजिक संस्था अथवा शासनाने ठरवून दिलेली वाट ओलांडत येथील इंडिगो सीएसआर अर्थ सहाय्यीत अफार्म संस्था आणि प्रेम फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण महिला उपजिवीका सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत इगतपुरी तालुक्यात पशुसखी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला. सहा महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रातील ४०० कुटूंबातील १०६६ जनांवरांवर उपचार करण्यात आले.

महिला सक्षमीकरणावर चर्चा करतांना त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे, हा हेतु डोळ्यासमोर ठेवत संस्थेने राज्यातील पुणे, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर या चार जिल्ह्यात काम सुरू केले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे, वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी या पाच गावातील एक हजार ८२५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना बरोबर घेत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. या पैकी एक पशुसखी. उपजिवीकेची सुरक्षितता वाढवतांना महिला नेतृत्व बळकट करणे, शाश्वत वैविध्यपूर्ण शेती आणि शेती आधारीत उपजिवीकांचा अभ्यास यामध्ये करण्यात येत आहे. पशुसखींची निवड करतांना संस्थेने गावातील गरीब, गरजु, विधवा, परित्यक्तांना प्रशिक्षण देणे पसंत केले. यामध्ये माणसांप्रमाणे जनावरांचेही आरोग्य अबाधित रहावे. त्यांना गावातच तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रासाठी पशुसखी उपक्रमाची आखणी झाली. पाचही गावात पशुसखींची निवड करण्यात आली.

निवडलेल्या पशुसखींना पाच दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निवडलेल्या पशुसखींना सर्व आवश्यक औषधांचे संच किरकोळ सहभाग मूल्य घेत वितरीत करण्यात आले. या पशुसखी पशुपालक कुटूंबाना, शेतकऱ्यांना सेवेच्या आधारावर वाजवी सेवाशुल्क घेत सेवा देतात. यामध्ये पीपीआर लसीकरण, ईटीव्ही लसीकरण, डी-वार्मिंग, आरटुबी लसीकरण, डे्सिंग, आयबीडी लसीकरण, कुक्कट पक्षी आणि शेळ्यांवर प्राथमिक उपचार, शेळ्यांचे खुर छाटणे, खाद्य आणि पोषण विषयी मार्गदर्शन करण्यात येते. मागील सहा महिन्यात पशुसखींनी ४०० कुटूंबातील १०६६ जनावरांना सेवा दिली. प्रकल्पातील तरतुदीनुसार या चालु वर्षी जनावरांची तपासणी व लसीकरणाच्या माध्यमातून १२०० कुटूंबातील ९७६ गाई, १२५९ शेळ्या, ७३८ कोंबड्यांवर उपचार केले. गाव पातळीवरच जनावरांना वेळेत आरोग्य सेवा मिळत असल्याने ग्रामस्थांनी याविषयी समाधान व्यक्त केले.

अफार्म संस्था आणि प्रेम फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण महिला उपजिवीका सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत इगतपुरी तालुक्यात पशुसखी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून उत्पन्नाचे नवे साधन मिळाल्याने पशुसखी या कामांशी संबंधित अद्यावत माहिती, प्रशिक्षण पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.