नाशिक – लाडक्या गणरायाला निरोप देण्याची घटिका अवघ्या काही तासांवर आली असतांनाही शहरातील मुख्य विजर्सन मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी खड्डे, विजेच्या लोंबकळणाऱ्या वायरी यांचे संकट कायम आहे. खड्डे त्वरीत बुजविण्याची सूचना पोलीस प्रशासनाकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. मिरवणूक मार्गावरील अडथळे अजूनही कायम असल्याने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

शहरात शनिवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत , महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची एकत्रित पाहणी केली. विसर्जन मिरवणूक वाकडी बारवपासून सुरु होते. त्या ठिकाणापासून पथकाने रविवार कारंजा सिग्नल पर्यंत पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्त्यातील खड्डे बुजविण्यास तसेच अडथळे, अतिक्रमण, लोंबकळणाऱ्या वायरी तातडीने हटविण्याचे आदेश राऊत यांनी दिले. विसर्जन मिरवणूक काळात शहरात स्वच्छता राहण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील गैरसोयींबद्दल नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे यांनी, मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर अजूनही खड्डे असल्याचे सांगितले. महापालिकेने पावसामुळे तत्काळ खड्डे बुजविता येणार नसल्याचे सांगितले असून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात येईल, असे सांगितल्याचे शेटे यांनी नमूद केले.

मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. ते काढण्याची मागणी केली आहे. याशिवाय १० वर्षांपासून वीज मंडळाला लोंबकळणाऱ्या वायरी काढण्याविषयी सांगितले जाते, परंतु, त्या वायरी आजही लोंबकळलेल्या स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मंडळाला एक ढोल पथक ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिरवणुकीत १२ टप्पे करण्यात आले असून ढोल वादनासाठी ठराविक ठिकाणी २० मिनिटांचा वेळ मंडळांना देण्यात आला आहे. मार्ग त्वरीत खड्डेमुक्त करावा, अशी मागणी केल्याचे शेटे यांनी सांगितले.

मिरवणूक मार्ग

नाशिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पारंपरिक मार्गानेच निघणार आहे. शनिवारी वाकडी बारवपासून मिरवणुकीला सुरुवात होईल. दूध बाजार-मेन रोड-धुमाळ पॉईंट- एम.जी. रोड- अशोक स्तंभ- रविवार कारंजा-अहिल्याबाई होळकर पूल-पंचवटी कारंजा-सरदार चौक- गोदाघाट असा मिरवणूक मार्ग आहे. यंदा मिरवणुकीत २० हून अधिक मंडळे सहभागी होणार आहेत.