जळगाव – पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेले शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, जावयाला दीड महिन्यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार खडसे यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी परिसरात टाकलेल्या छाप्यात प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग होता. याशिवाय कारवाई दरम्यान संशयितांकडून कोकेन, गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, १० भ्रमणध्वनी संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या, असा बराच मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या भ्रमणध्वनीमधून महिलांशी झालेला संवाद, पार्टीतील छायाचित्रे, चित्रफीत मिळाल्याचे पुणे पोलिसांनी नंतर न्यायालयात सांगितले होते.

याशिवाय, २०२२ ते जून २०२५ या कालावधीत खेवलकर यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून महिलेचे विना संमती निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार, सायबर पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणातील जामनेरमधील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोप करून भाजप नेते गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार खडसे यांनी जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावरून मंत्री महाजन यांना कोंडीत पकडण्यात खडसे यशस्वी झाल्याचे दिसूनही येत होते.

मात्र, त्याच दिवशी मध्यरात्री जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झाल्याने खडसे यांच्यावर मान खाली घालण्याची वेळ आली. मंत्री महाजन यांनीही खडसे यांच्यावर त्यामुळे नंतरच्या काळात जोरदार टीका करण्याची आयती संधी साधली होती.

आता उशिरा का होईना जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे पोलिसांनी प्रांजल यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे असल्याचे मी त्यावेळीही म्हटले होते. मुळात ती रेव्ह पार्टी नव्हती, तर एका घरातली साधी पार्टी होती. तरीही पोलिसांनी प्रांजल यांना पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार ठरविले, कारण काय तर म्हणे त्यांच्यावर आधीच खूप गुन्हे दाखल आहेत. प्रत्यक्षात, पोलिसांनी प्रांजल यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल नसल्याची नंतर कबुली देखील दिली.

प्रांजल यांनी कोणताही अंमली पदार्थ सेवन केला नाही की बाळगला नाही. असे असताना त्यांना कोणाच्या सांगण्यावरून अडकविण्यात आले, याचे उत्तर आपल्याला अजुनही मिळालेले नाही, असे खडसे म्हणाले. हा राजकारणाचा आणि खडसे परिवाराला बदनाम करण्याचा एक डाव आहे. महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या थरावर गेले आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका देखील त्यांनी केली.