राजकीय डावपेचांमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कमी मतदानाचा लाभ नेमका कुणाला होणार, याविषयी तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. सत्यजित तांबेंची बंडखोरी आणि ऐनवेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवत रिंगणात उतरलेल्या शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी मतमोजणीतून होणार आहे. सय्यद पिंप्री येथील नवीन शासकीय गोदामात मतमोजणीची तयारी पूर्णत्वास गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक उमेदवाराचा अभाव, निवडणूक आयोगाच्या लिंकवर केंद्र न सापडण्याचा गोंधळ आणि एकाही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नसणे आदींचा परिणाम मतदानावर झाल्याचे उघड झाले. जवळपास निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. यात महिला पदवीधरांची टक्केवारी अधिक आहे. सायंकाळी काही केंद्रांवर मतदारांची गर्दी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी ४९.२८ टक्क्यांपर्यंत गेली. विभागातील दोन लाख ६२ हजार ६७८ पैकी एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक जिल्ह्यात ४५.८५ टक्के, अहमदनगर ५०.४०, धुळे ५०.५०, जळगाव ५१.४४ आणि नंदुरबार जिल्ह्यात ४९.६१ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी घसरल्याने त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचे आडोखे उमेदवारांच्या समर्थकांकडून बांधले जात आहे.

हेही वाचा – नाशिक : दिवाळीत हवेत गोळीबार करणाऱ्यास अटक

महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या शुभांगी पाटील, भाजपचा अनधिकृत पाठिंबा मिळालेले सत्यजित तांबे, वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार यांच्यासह एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. पाटील या खान्देशातील धुळ्याच्या तर तांबे हे नगर जिल्ह्यातील आहेत. आपापल्या भागात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीच्या आधारे उमेदवार आणि कार्यकर्ते समीकरणे मांडत आहेत. भाजपकडून छुप्या पद्धतीने तांबे यांना बळ देण्यात आले असले तरी आपण अपक्षच आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. या खेळीतून काय साध्य झाले, हे निकालातून स्पष्ट होईल. दुसरीकडे शुभांगी पाटील यांच्या पाठिशी महाविकास आघाडीने ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या क्षणी नाशिकची जागा शिवसेनेने आपल्याकडे घेऊन त्यांना पुरस्कृत उमेदवार केले. काँग्रेसच्या नेत्यांना संभ्रम दूर करण्यासाठी प्रचारात सहभागी व्हावे लागले. अपक्ष उमेदवारांचा भरणा असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा – नाशिक : गोदापात्र स्वच्छतेला मुहूर्त, प्रगट दिनाचे औचित्य साधून मोहीम

सय्यद पिंप्री येथील नव्या शासकीय गोदामात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. या कामासाठी नियुक्त ३०० कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी अंतिम प्रशिक्षण सत्र होणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी आठ वाजता २८ टेबलवर मतमोजणीला सुरूवात होईल. प्राथमिक मोजणीत १२ फेऱ्या होतील. नंतर पाच फेऱ्या होतील. मतमोजणीसह अन्य कामांसाठी ३०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी स्थळावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून २५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

  • गुरुवारी सकाळी आठ वाजता २८ टेबलवर मतमोजणीला सुरुवात.
  • प्राथमिक मोजणीत १२ फेऱ्या, नंतर पाच फेऱ्या.
  • मतमोजणीसाठी ३०० कर्मचारी.
  • २५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

…तर मतमोजणी लांबणार

निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान झाले आहे. मतमोजणीच्या प्राथमिक फेरीत एखाद्या उमेदवाराने कोटा गाठल्यानंतर निकाल लागू शकेल. पण कुणाला कोटा गाठता न आल्यास मोजणीच्या पुढील फेऱ्या कराव्या लागतील. त्यामुळे मतमोजणी लांबू शकते, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations for the counting of votes for the nashik graduate constituency election are complete ssb
First published on: 01-02-2023 at 11:02 IST