नाशिक : गुन्हेगारीचा वाढता आलेख, गुन्ह्यात असलेला बालगुन्हेगारांचा सहभाग, समाजमाध्यमांचा गुन्हेगारी विश्वात झालेला शिरकाव, महिलांवरील वाढते अत्याचार यासह वेगवेगळ्या मुद्यांवर प्रबोधन करण्यासाठी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पुढाकार घेतला आहे. विभागातील पाचही जिल्ह्यामंध्ये या अनुषंगाने शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग या ठिकाणी पोलीस विभागाकडून प्रबोधन करण्यात येत आहे.
काही वर्षात नाशिक विभागाचा गुन्हेगारीचा आलेख हा सतत उंचावत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस दलाकडून कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांची धिंड, काही घटनांचा तात्काळ उलगडा, गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाया, मकोका, अशा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे. मात्र समाजकंटकांचे पोलिसांना आव्हान देणे सुरुच आहे. आता विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी पुढाकार घेतला आहे. गुन्हेगारीत बाल गुन्हेगारांचा असणारा सहभाग पाहता कराळे यांनी या गटावर लक्ष केंद्रित करत शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने प्रबोधन करण्यात येत आहे. आठवडाभरात सुमारे साडे बारा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
या अभिनव उपक्रमात थेट संवाद होवू लागल्याने पोलिसांबाबतची भिती दूर होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांकडून गावपातळीवरील गुन्हेगारी प्रवृत्तीची माहिती उपलब्ध होत असल्याचे कराळे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी सहायक निरीक्षक नयना आगलावे, लघुलेखक अरुण शेलकर उपस्थित होते.कार्यक्षेत्रात नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांमध्ये १३७ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, वसतिगृहे, आश्रमशाळा तसेच खासगी शिकवणी वर्ग प्रमुखांना पोलीस निरीक्षकांनी निमंत्रित केले.
गुरूपोर्णिमेनिमित्त त्यांचे स्वागत आणि सत्कार करतानाच गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. गुन्हेगारीशी संबंधित काही ज्वलंत मुद्द्यांवर विशेष पोलीस निरीक्षक कार्यालयाने सादरीकरण तयार केले असून, प्रशिक्षित पोलीस अधिकाºयांद्वारे त्याबाबतची माहिती शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गात चर्चासत्र आयोजित करून त्यामध्ये दिली जाऊ लागली आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून उपस्थित होणाऱ्यां शंकांचे निरसन पोलीस अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.
याकरीता ६० पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर गुन्हेगारी, वाहतूक समस्या, नियमन व जागरूकता, महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरोधी जनजागृती याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. स्वत:ची फसवणूक टाळण्याबरोबरच आपले कुटुंबीय आणि परिचितांनाही त्याबाबत सजग करण्याचे आवाहन करण्यात येते आहे. हे सर्व अधिकारी आपली कर्तव्ये सांभाळून शाळा, महाविद्यालयांच्या सोयीनुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत मोहिमेचा पहिला टप्पा सुरू राहणार असल्याची माहिती कराळे यांनी दिली.