जळगाव : गेल्या आठवड्यात जबलपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेसमध्ये दरोडा पडल्याने सुमारे १.८२ कोटी रूपयांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात, गुन्हा दाखल झाल्यावर भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण हे बनावट असल्याचे उघडकीस आले. सर्व मुद्देमाल केवळ ७२ तासांत ताब्यात घेऊन चारही संशयितांना अटक करण्यात आली.
१२१८७ जबलपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेसमध्ये दरोड्याची घटना ३० सप्टेंबरला घडल्याचे सांगून सागर पारेख याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील शासकीय रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पारेख याने आपल्या तक्रारीत ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्या, असे एकूण १.५ किलोग्रॅम वजनाचे आणि एक कोटी ८२ लाख रूपये किंमत असलेल्या दागिने चोरी झाल्याचे नमूद केले होते. तपासाअंती घटना घडलेले ठिकाण जीआरपी पोस्ट खंडवा यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानुसार सदरचे प्रकरण जीआरपी खंडवा यांनी शुक्रवारी त्याच कलमांखाली गुन्हा क्रमांक २१९/२०२५ म्हणून पुन्हा नोंदवले आणि भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाची मदत मागितली.
वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पोस्ट खंडवा, गुन्हे गुप्तवार्ता शाखा आणि भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एक संयुक्त तपास पथकाची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही छायाचित्रण, डिजिटल ट्रॅकिंग, मोबाईल कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि मार्ग नकाशांकन, यासारख्या आधुनिक तपास साधनांचा प्रभावी वापर करून पथकाने घटनेचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले. तपासातून असे उघड झाले, की पारेख याने दिलेल्या तक्रारीतील दरोडा पूर्णपणे बनावट असून तो तक्रारदाराने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आखला होता.
चौकशी दरम्यान संशयितांनी खोट्या दरोड्याला खरा भासविण्यासाठी स्वतःला जाणूनबुजून दुखापत केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी हा दरोडा बनावट असल्याचे मान्य करत सोन्याचे दागिने आपला साथीदार प्रवीण याच्याकडे कल्याण रेल्वे स्थानकावर सुपूर्त केले होते. प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत प्रवीणला रेल्वे सुरक्षा दलाच्या खंडवा पोलीस ठाण्यात बोलावले. त्या ठिकाणी तो शनिवारी संपूर्ण मुद्देमालासह हजर झाला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश होता. ज्यांचे एकूण वजन १.६ किलो आणि किंमत सुमारे १.८२ कोटी रूपये निघाली.
संपूर्ण मुद्देमाल कायदेशीर नोंदीसह जप्त करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई येथील आर. बी. ज्वेलर्स आणि गोल्ड लिमिटेडमध्ये भागीदार असलेला सागर पारेख (४०, रा. नाशिक), संजय कुमार (२७, रा. पाली, जि. राजस्थान; सध्या मुंबई), प्रवीण कुमार (३५, रा. सिरोही, जि. राजस्थान; सध्या दिवा ईस्ट, ठाणे), राकेश जैन (५३, रा. मलबार हिल्स, मुंबई) या चार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक प्रकाशचंद्र सेन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.