नाशिक : शेतकरी हाच आपल्या पक्षाचा प्राण असल्याचे हेरुन आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तयारीला सुरुवात केली असून त्याअंतर्गत नाशिक येथे रविवारी पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर सोमवारी ईदगाह मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती आहे.
ग्रामीण भागाशी शरद पवार यांनी राजकारणात आल्यापासून जोडलेली नाळ अजूनही तुटू दिलेली नाही. विशेषत: शेतकरी हा त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. त्याचे दर्शन सोमवारी नाशिक येथेही सर्वांना झाले. नाशिक येथील ईदगाह मैदानापासून सोमवारी दुपारी शरद पवार गटाच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.या मोर्चाची तयारी पक्षाकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मोर्चासाठी ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बैलगाडीही मोर्चासाठी आणण्यात आली आहे. मोर्चाच्या ठिकाणी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, रोहिणी खडसे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित झाले असताना सर्वांना शरद पवार यांच्या आगमनाची उत्सुकता होती.
अखेर शरद पवार आल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, पुन्हा सत्ता मिळाल्यानंतरही अद्याप कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही. कर्जमाफी त्वरीत जाहीर करावी, कांद्याची मुक्त निर्यात सुरु करावी, कापसाची आयात थांबवावी, शेतीमालाला हमी भाव द्यावा, यासह इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील कांदा आणि केळी उत्पादकही मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले आहेत.
शरद पवार हे खुल्या जीपमधून मोर्चात सहभागी झाले. त्यांच्या जीपच्या पुढील भागात ठेवण्यात आलेले कांदे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कांदा उत्पादक म्हणजेच शेतकरी हाच आपला खरा आधार असल्याचे याव्दारे राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमिवर कांदा उत्पादकांना पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न याव्दारे शरद पवार गटाने केला आहे. काही महिन्यांपासून कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महायुती सरकारविरुध्द त्यांची नाराजी वाढत आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जात आहे.