नाशिक: आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष सक्रिय झाला आहे. नाशिक येथे पंचवटीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे रविवारी त्यानिमित्ताने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. पक्षाचे वादळी नेते म्हणून ओळख असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मार्गदर्शन केले.

जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी मत मांडले. मराठा विरुध्द ओबीसी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. मराठा -ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यानंतरच लोकांना काय मिळाले, हे कळेल.. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही शरद पवार गटाची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. सध्यातरी कोणाच्या हातात काय आहे, कोणी काय गमावले, हे काहीच समजत नाही.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. महात्मा गांधीची हत्या करणारा महाराष्ट्रात जन्माला आला. आरएसएस गुजरातमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रात स्थापन झाले, असे त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांच्याविषयी करण्यात येत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. छगन भुजबळ यांना लाथ मारा, मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी भाषा वापरण्यात येत आहे. एका समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असे बोलणे अयोग्य आहे. अशा ज्येष्ठ नेत्याचा, ज्येष्ठ मंत्र्याचा अपमान महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही, असे म्हणत आव्हाड यांनी शरद पवार हे कसे नेत्यांचा मान राखतात, याविषयीचे एक उदाहरण दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकदा पवार साहेबांवर टीका केली असता वातावरण तापले होते.

पवार साहेबांनी मध्यरात्री पोलिसांची बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे यांच्या सुरक्षेत तीन पट वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली. कधीकाळी जमीनदार असलेला मराठा आज अल्पभूधारक झाला आहे. आरक्षणाचा फायदा कोणा एकाला होत नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडल्यास आमच्या पक्षाचे खासदार पाठिंब्यासाठी उभे राहतील. जातीय जनगणना करण्याचा निर्णय बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला गेल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.