जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात यापूर्वी काही बालकांचा जीव गेला असताना, धुळे पाडा आदिवासी वस्तीवरील सहा वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, वडिलांनी वेळीच दाखविलेल्या धाडसामुळे त्याचा जीव वाचला. गंभीर जखमी अवस्थेतील मुलावर आता जळगावात उपचार सुरू आहेत.
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी धुळे पाडा ही आदिवासी वस्ती आहे. येथील रहिवाशी इगरा झेंदला बारेला (२८) हा त्याचा मुलगा महेश बारेला (सहा) याला बरोबर घेऊन शेतात जनावरांसाठी वैरण आणायला गेला होता. गवत कापणी झाल्यानंतर बाप आणि मुलगा दोघे गवताचे ओझे घेऊन घरी येत असताना, रस्त्यालगत लपलेल्या बिबट्याने महेशवर अचानक हल्ला केला. त्यामुळे घाबरलेला मुलगा जोरात ओरडल्याने इगला बारेला याने डोक्यावरील गवताचे ओझे कोणताही विचार न करता बिबट्याच्या अंगावर फेकून प्रतिक्रार केला. त्यामुळे बिबट्या तोंडात पकडलेल्या महेशला सोडून पळून गेला. सहा वर्षीय महेश बचावला असला, तरी त्याच्या डोक्याला तसेच मानेजवळ गंभीर दुखापत झाली आहे. तातडीने त्याला यावल येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, अमोल अडकमोल आदींनी उपचार केले. गंभीर दुखावत असल्याने शुक्रवारी त्यास पुढील उपचाराकरिता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
यावल तालुक्यात साकळी गावाजवळील मानकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय आदिवासी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मार्चमध्ये घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वन विभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक बनलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतरही सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या यावल तालुक्यात अधुनमधुन बिबट्या वावरताना दिसून आला आहे. याशिवाय, जळगाव तालुक्यातील देवगाव येथे एका वयोवृद्ध महिलेचा शेतात काम करत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात मृत्यू झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नरभक्षक बनलेल्या बिबट्यांचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावी, अशी मागणी होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातही वाघांचा वाढता वावर आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. कोथळी आणि मानेगाव शिवारानंतर आता हरताळा शिवारात प्रत्यक्षात कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाले आहे. परिणामी, या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाले आहेत. शेतकरी आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे, शेतामध्ये योग्य प्रकाश व्यवस्था करावी, पशुधन सुरक्षित जागी बांधावे तसेच कोणतीही हालचाल किंवा संशयास्पद गोष्ट आढळल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.