नाशिक : अवकाळी पाऊस, गारपिटीचा उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा बसला. प्राथमिक अहवालानुुसार सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले असले तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये भाजीपाला, टोमॅटो, कांदा, गहू, द्राक्ष, बाजरी तर खान्देशात केळी, गहू, मका, हरभरा, पपईचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी ढगाळ वातावरण असले तरी सायंकाळपर्यंत अनेक भागात पावसाने काहिशी उघडीप घेतली होती. यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन, तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात अवकाळीचा शेकडो गावांना फटका बसला. धुळ्यातील साक्री तालुक्यास गारपिटीसह पावसाने झोडपून काढले. चार ते सहा मार्च या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील १९१ गावे बाधीत झाली. २७९८ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड तालुक्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. उर्वरित भागातील प्राथमिक अहवालांची प्रतीक्षा आहे. ते प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. निफाड तालुक्यात गहू आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. इतरत्र कांदा, गहू, भाजीपाला, टोमॅटो, आंब्याचे नुकसान झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> नाशिक : आश्वासन पूर्तीअभावी प्रकल्पग्रस्त आक्रमक; अंबड भूपीडित शेतकरी समितीचा आंदोलनाचा इशारा

गारपिटीचा फटका बसलेल्या धुळ्यातील साक्री तालुक्यात केळी तर, शिंदखेडा तालुक्यात मका, गहू, हरभरा, ज्वारी, पपईचे नुकसान झाले. शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील प्रत्येकी दीड हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या जिल्ह्यात १६४ गावातील ४५३७ शेतकरी बाधित झाले. एकूण ३१४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाने ज्वारी आणि केळीचे नुकसान झाले. ७६१६ शेतकऱ्यांना झळ बसली. ३६५ गावात सहा हजारहन अधिक हेक्टरचे नुकसान झाले. दरम्यान, विभागात ज्या, ज्या भागात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे, तिथे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नाशिकचे पालकमंत्री कुठे ?

नैसर्गिक आपत्तीने उत्तर महाराष्ट्रात मोठे नुकसान झाल्यानंतर धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागात पाहणी करून आढावा घेतला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मात्र जिल्ह्यात आढावा घेताना दिसले नाहीत. त्यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसे हे सोमवारी रात्री आठ वाजता मुंबईहून मालेगावला आले होते. रात्री ११ वाजता ते लगेचच मुंबईला निघून गेले. मंगळवारी ते नाशिकमध्ये नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांना करता आली नसावी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The challenge of standing front of farmers again damaged agriculture nashik ysh