जळगाव : राज्यातील अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत असताना जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मार्गावरून तशी कोणतीच एक्स्प्रेस आजतागायत धावताना दिसून आली नव्हती. मात्र, पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर आता लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबणाऱ्या या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही त्यास दुजोरा दिला.

मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून करण्यात येत होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेक वेळा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. उशिरा का होईना आता वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणी यश आले आहे. लवकरच पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसमुळे पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व आरामदायी होऊ शकणार आहे. ज्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनाही होणार आहे.

नागपूर-पुणे फक्त १२ तासात

सद्यःस्थितीत नागपूर ते पुणे दरम्यान अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात. मात्र, दुरांतो एक्स्प्रेस वगळता इतर सर्व रेल्वे गाड्यांना पुण्याहून नागपूर पोहोचण्यासाठी १५ ते १६ तास सहजपणे लागतात. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास अवघ्या १२ तासात शक्य होईल. ही नवीन गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे ठरणार. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वात जलद रेल्वे गाडी आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला १२ तास ५५ मिनिटे वेळ लागतो. नव्याने सुरू झालेल्या वंदे भारतला दुरांतोपेक्षा एक तास कमी वेळ लागणार आहे.

असे असेल वंदे भारतचे वेळापत्रक

पुणे-नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी सुटेल. आणि अजनीला त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. वंदे भारत एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी अजनीहून सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा, या स्थानकांवर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा असणार आहे.