नाशिक – गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून पोलीस यंत्रणा शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना असाच गुन्हा दाखल झालेले ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्याविरोधातील तक्रार ते भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण तक्रारदार गजू घोडके यांनी दिले आहे. लवकरच आपण राजवाडे आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दुजोरा बागूल यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यात बागूल आणि राजवाडे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मारहाण आणि चोरीच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या बागूल आणि राजवाडे यांचा मध्यंतरी होणारा भाजप प्रवेश ठाकरे गटाच्या आरोपांमुळे लांबणीवर पडला होता. ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने मोकळा झाला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना हाताशी धरून आम्हाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने होत आहे. उपरोक्त घटनेत तक्रारदार गजू घोडके यांनी राजकीय दबावातून तक्रार मागे घेतली नसल्याचे स्पष्ट केले. मी हिंदुत्ववादी संघटनेचे काम करतो. ही घटना घडली. तेव्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले. बागूल आणि राजवाडे भाजपमध्ये येत आहेत. हिंदू राष्ट्राच्या हेतूने तक्रार मागे घेतल्याचे घोडके यांनी सांगितले.
यासंदर्भात सुनील बागूल यांनीही उपरोक्त गुन्ह्याच्या तपासात काही निष्पन्न झाले नसल्याने आणि तक्रारदाराने तसा जबाब दिल्याने हा विषय संपुष्टात आल्याचे सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आपल्यासह राजवाडे आणि समर्थकांच्या प्रवेशाची तारीख निश्चित केली जाईल. अधिवेशन सुरू असल्याने नेतेमंडळी गडबडीत आहेत. लवकरच प्रवेशाची तारीख व स्थळ निश्चित होईल, असे बागूल यांनी सांगितले.
प्रकरण काय ?
शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुनील बागूल यांच्याविषयी समाज माध्यमात चित्रफित प्रसारित केल्याच्या रागातून टोळक्याने घरात शिरून मारहाण केल्याची तक्रार गजू घोडके यांनी दिली होती. त्यावरून बागूल, महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह सात जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यानंतर ठाकरे गटाने तक्रारदार घोडके हा पोलीस नोंदीतील गुन्हेगार असून समाज माध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची बदनामी करणे, व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून संबंधितांकडून खंडणी वसूल करणे, अशी कामे करीत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.