नाशिक : महिला सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध उपाययोजना राबवत असतांनाही अत्याचाराचा आलेख उंचावत असताना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सहा महिन्यांपासून कार्यान्वित महिला मदत कक्ष महिलांवरील अत्याचाराविरोधात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

महिलांविरूध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यांचा तपास करणे तसेच महिलांविरूध्द अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महिला बळकटीकरणासाठी निर्भया फंड अंतर्गत नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो यांच्याकडून प्राप्त निधी यासाठी वापरण्यात आला. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या महिला मदत कक्षाची स्वतंत्र रचना आहे. महिलांना या ठिकाणी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता येतो. त्यांच्या तक्रारीची वेगळी नोंद घेती जाते. कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील शारीरिक आणि मानसिक अत्याचार, त्यांची होणारी फसवणूक, यासाठी हा कक्ष काम करतो. या महिला मदत कक्षांसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ४० दुचाकींचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात अतिदुर्गम भाग, तालुकास्तर तसेच खेड्यापाड्यांवर रहाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष सक्रिय झाला आहे. शाळा, महाविद्यालयांना कक्षाचे अधिकारी, कर्मचारी भेटी देत आहेत. विद्यार्थिनींना शाळेत, घरात किंवा बाहेर होणारा त्रास, सायबर गुन्हेगारी यासह इतर त्रासासंदर्भात महिलांना मदत वाहिनींची माहिती दिली जात आहे. यासाठी व्याख्यान, चर्चासत्रातून महिला हक्क, त्यांच्याविषयी असलेल्या सुविधा, याची माहिती देण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे क्रमांक दिले जात असून थेट संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महिला मदत कक्षाचे स्वरुप

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच, भ्रमणध्वनी, उपयुक्त साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार यांच्या उपलब्धतेनुसार त्यांची नियुक्ती कक्षांमध्ये करण्यात येत आहे. महिलांना शीघ्र मदत मिळावी, त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी काम होत आहे. महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.