नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर नवी मुंबईत राजकीय वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांहून अधिक काळापासून पुतळ्याचे लोकार्पण रखडल्याने याचे अनावरण मनसेकडून अचानक करण्यात आले. ही कृती नियमबाह्य असल्याचे सांगत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेरूळच्या राजीव गांधी पुलावरून उतरताच पूर्वेला असलेल्या चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संपूर्ण चौकाचे सौंदर्यीकरण जवळपास १.०६ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. यातील पुतळ्याच्या निर्मितीसाठी ४६ लाखांहून अधिक खर्च झाला आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही पुतळा ४ महिन्यांहून अधिक काळापासून झाकून ठेवण्यात आल्याने शिवभक्तांसह स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र पुतळ्याचे लोकार्पणाबाबत महापालिकेच्या विविध विभागांकडून विसंगत माहिती दिली जात होती. उद्घाटन लांबणीवर गेल्याने प्रशासनावर जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप शिवभक्तांकडून केला जात होता.

रविवारी दुपारी २.२४ वाजता मनसेने नेते अमित ठाकरे, शहराध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्ते पुतळा असलेल्या चौकात पोहोचले. यावेळी पोलिसांनी आक्षेप व्यक्त करूनही कार्यकर्त्यांनी पुतळ्यावरील मळके कापड काढून पुतळ्यावर जलाभिषेक करत अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

या नंतर महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ही कृती संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय करण्यात आल्याने अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याची गंभीर दखल घेत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे उल्लंघन व परवानगीशिवाय अनावरणाचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. अनावरणानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत, “महाराजांना मळक्या कापडात गुंडाळलेलं मला पहावलं नाही. म्हणून मी हे कृत्य केलं. माझ्या आयुष्यातील पहिला गुन्हा जर महाराजांसाठी होणार असेल तर त्याचा मला आनंद आहे,” असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे अमित ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवी मुंबईतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पुतळ्याभोवतीची कामे अद्याप सुरू असून कामें पूर्ण झाल्यानंतरच समारंभपूर्वक रीतसर पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येईल. असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.