नवी मुंबई – आठ वर्षात राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात गप्प बसलेल्या सिडको महामंडळाच्या दक्षता विभागाने मागील तीन वर्षात तब्बल २१६ जणांना पकडले. नुसतेच धरपकडीची कारवाई न करता या २१६ जणांवर नवी मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात ७८ वेगवेगळे फौजदारी गुन्हे नोंदविले. तसेच यासाठी २०१ डंपर व ट्रक अशी वाहने सिडकोच्या या भरारी पथकाने ताब्यात घेतली. जे गेल्या तीन वर्षात घडले ते यापूर्वीच्या सिडकोच्या दक्षता विभागाच्या इतर अधिका-यांच्या हातून का घडले नाही, अशी विभाग प्रमुखांच्या कामगिरीच्या मूल्यांकनाची विचारणा करणारी कोणतीही यंत्रणा सिडकोत अमलात नाही याचीच चर्चा सिडकोत सध्या सुरू आहे.
सिडको महामंडळाच्या जागेवर उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात सिडकोची परवानगी न घेता मुंबईतून राडारोडा आणून अवैधपणे मोकळ्या जागेवर फेकला जातो. २०१४ ते २०२२ या ८ वर्षांच्या काळात अवैध राडारोडा फेकणाऱ्यांविरोधात अवघे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये ७ संशयित आरोपींना अटक करून त्यांच्या ७ डंपरवर कारवाई करण्यात आली. सिडकोचे दक्षता विभागाचे प्रमुख पद सुरेश मेंगडे यांच्याकडे आल्यावर मुंबईतून विना परवाना राडारोड्याने भरलेले डंपर पकडण्यासाठी सिडकोने स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक केली.
सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच सूरक्षा विभागाचे अधिकारी यांच्या रात्रपाळ्यांना नेमणूक करण्यात आली. या कारवाईसाठी नवी मुंबई पोलीस दलाची मदत घेण्यात आली. पोलीस व सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईमुळे आतापर्यंत या पथकाने ४ पोकलेन व जेसीबी यंत्र जप्त केली. सिडकोच्या या धडक कारवाईविरोधात मुंबईतील काही वाहतूकदारांनी एकत्र येऊन सिडकोत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र सिडकोचे दक्षता विभाग कारवाई नमले नाही. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता उलवे सेक्टर-१३ येथे अनधिकृतपणे राडारोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपरचालक ज्ञानेश्वर सुखदेव पवार (रा. जळगाव) याला पकडण्यात आले.
कारवाई अधिक तीव्र करणार
सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख मेंगडे यांनी सिडको संपादित भूखंडांवर विना परवानगी राडारोडा टाकल्यास किंवा अनधिकृत माती उत्खनन केल्यास दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले आहे. पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी विकासासाठी अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र केली जाईल. तसेच नागरिकांनीही असे प्रकार दिसल्यास http://www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.
अटल सेतूमार्गे नवी मुंबईत विल्हेवाट
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनेक डंपर रात्रीच्या काळोखात राडारोडा घेऊन अटलसेतू मार्गे विना परवानगी नवी मुंबईत विल्हेवाटीसाठी घेऊन येतात. या मागे मोठी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जाते. गेल्या ११ वर्षात नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ७८ गुन्हे दाखल झाल्यानंतरसुद्धा हा धंदा कायमचा रोखण्यासाठी या काळ्याधंद्याच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊ शकले नाहीत.