प्रतिनिधी लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांना विजयी करा असे आवाहन करत असतानाच बंडखोर उमेदवाराला साथ देणाऱ्या स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना तंबी दिली. या मतदारसंघात बंडखोरी करणारे विजय नहाटा यांना टाटा करा, अशा गद्दारांना मी थारा देणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना इशारा दिला. नहाटा यांना माझ्याकडे थारा असणार नाही असेही ते म्हणाले. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर असून जे कोणी नहाटा यांना साथ देत आहेत, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

नेरुळ येथे रामलीला मैदानात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी त्यांनी बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांना उद्देशून मंदा म्हात्रे यांचीच साथ करायची आहे असे सांगितले. हे करत असताना त्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले पक्षाचे उपनेते विजय नहाटा यांनाही लक्ष्य केले. नवी मुंबई हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कोणी दिशाभूल करत असेल तर लक्षात ठेवा आमचे पाठबळ मंदा म्हात्रे यांना आहे. इथे कोणी नहाटा, फाटा, काटा काही चालणार नाही. त्यांना टाटा करा, असे आवाहन त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. ज्यांना ताकद दिली, मोठे केले. त्यांनी बेईमानी केली. बेईमानी करणाऱ्यांना माझ्याकडे थारा नाही. त्यांचा हिशोब मी करेल अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मंदा म्हात्रे ही माझी लाडकी बहिण आहे आणि तीच विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-तळोजात साडेपाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलीसांची कारवाई

मी बोलते, ओरडते, ते लोकांच्या कामासाठी

मी बोलते, ओरडते ते लोकांचे काम व्हावे म्हणून. माझेच नाव पुसून टाकायचे काम कोणी करत असेल तर मी काय गप्प बसणार असा सवाल यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला. मी एक महिला आहे आणि यांना पुरून उरले आहे. या सभेला जाऊ नये म्हणून गरिबांना झोपड्या जाळण्याच्या धमक्या दिल्या गेल्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मंदा म्हात्रे भावुक

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मंदा म्हात्रे यांना तुमच्या प्रचाराला मी येईन असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. म्हात्रे यांना उमेदवारी मिळवून देण्यातही मुख्यमंत्र्यांचा वाटा मोठा होता. मुख्यमंत्र्यांनी सभेत आक्रमक भाषण करताना नाहटांवर तोफ डागल्याने मंदा म्हात्रे भावुक झाल्याचे चित्र दिसले. ‘तुम्ही माझ्या प्रचाराला आलात, मी तुमची ऋणी आहे’ अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde warning to those supporting rebels in belapur appeals to make manda mhatre winner mrj