नवी मुंबई : पनवेल शहर पोलिस आणि कल्याण-खडकपाडा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत आंबिवली येथील ईराणी वस्तीतून एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे. या आरोपीने पनवेल आणि आसपासच्या परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचे अनेक गुन्हे केल्याचा संशय आहे. या सर्व घटना सुरक्षा कॅमेऱ्यात (सीसीटीव्ही) कैद झाल्याने पोलिसांना या व्यक्तीचा तपास करणे सोयीचे झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांनी परिसरातील सुरक्षा कॅमेऱ्यांचे चित्रफिती (फूटेज) बारकाईने तपासल्या. त्यातून एका संशयित व्यक्तीची ओळख पटली.
यानंतर पनवेल शहर पोलिस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून सापळा रचला. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रात्री ७:३० च्या सुमारास हा संशयित व्यक्ती आंबिलीतील इराणी वस्तीत एका महिलेशी गप्पा मारत उभा होता. तेव्हा दुचाकीवरील दोन साध्या वेशातील पोलीस त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. इतक्यात या व्यक्तीला काही सुगावा लागण्या आधीच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यातून निसटण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या पथकाने नियोजनपूर्वक कारवाई करत आंबिवली येथील ईराणी वस्तीतून संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपी हा पूर्वीपासूनच सोनसाखळी चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.
पोलिस तपासात उघड झाले आहे की, या आरोपीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ११ गुन्हे नोंदवलेले आहेत. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, नाशिक आदी ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी अत्यंत चलाख पद्धतीने दुचाकीवरून प्रवास करताना महिलांना लक्ष्य करत असे. काही क्षणांत सोनसाखळी हिसकावून तो पसार होत असे. त्याच्यावर पूर्वीपासूनच गुन्ह्यांची नोंद असून, त्याला सराईत गुन्हेगार म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
सध्या आरोपीकडून सखोल चौकशी सुरू असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी या आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाईस पात्र असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते आहे.