नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी आग्रही असणाऱ्या आंदोलकांमध्ये आता वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी भिवंडी ते जासई अशी काररॅली काढत मध्यंतरी या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत या नामांतरासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा अशी मागणी पुढे आली. त्यावर भाजपशी संबंधित नेत्यांनी आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांनाच भेटून यातून मार्ग काढता येईल अशी भूमिका मांडली. आंदोलन की चर्चेतून तोडगा या दोन पर्यायांवरून या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वप्रथम तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे आणली. या मागणीचे पत्र शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. या पत्रानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजांत तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. कोविड काळादरम्यानच विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिले गेले. असे असले तरी हे आंदोलन तीव्र व्हावे यासाठी सुरुवातीपासूनच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भाजप नेते अग्रभागी होते. विमानतळ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यातच प्रकल्पाचे नामकरण व्हावे असा आग्रह धरला गेला होता. अटल सेतूच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर एका पाहणीसाठी आलेले केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची भेट घेऊन संघर्ष समितीच्या नेत्यांनी दि.बा. यांच्या नावासाठी वेळोवेळी आग्रह धरला आहे.
संघर्ष की समेट यावर मतभेद?
विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी काही दिवसांपूर्वी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी जासईपर्यंत काररॅली काढली. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेस भाजपचे बहुसंख्य नेते अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. या सभेत बाळ्यामामा यांच्यासह शेकाप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आक्रमक भाषणे केली. संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील या सभेस उपस्थित राहिले. या सभेस मोठ्या संख्येने आगरी-कोळी समाजांतील रहिवासी उपस्थित होते. या सभेनंतर शनिवारी वाशी संघर्ष समितीमार्फत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भिवंडीचे खासदार बाळ्यामामा आणि त्यांचे विरोधक माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे बोलले जाते. हा प्रश्न आंदोलनाशिवाय सुटणार नाही. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वी आंदोलन हाती घ्या, अशी मागणी या वेळी बाळ्यामामा यांनी केली. त्यावर आंदोलन करून जर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव लागत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा टोला कपिल पाटील यांनी लगावला. ‘आंदोलन करायचे नसेल तर तुम्ही आम्हाला शब्द द्या, विमानतळाचे नामकरण कधी होईल’, असा प्रश्न या वेळी बाळ्यामामा यांनी उपस्थित केला. त्यावर प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठविण्याचे काम केले आहे. नामकरणाला काही प्रक्रिया असते, असे प्रतिउत्तर पाटील यांनी दिले.
बैठकीत मतांतरे
दरम्यान, या बैठकीत दोन्ही बाजूंनी मतांतरे पाहायला मिळाली. बैठकीस उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी दि.बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला दिले जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, असा शब्द उपस्थितांना दिला. तर उपस्थितांपैकी काही जणांनी आक्रमक आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही, अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. यावर संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि पुन्हा आठ दिवसांनी भेटून चर्चा करू, असे सांगून उपस्थितांना शांत केले.
