नवी मुंबई: कल्याण तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबईत पालिकेत समावेश करणाऱ्याला गणेश नाईकांचा तीव्र विरोध आहे. याच विषयावर पुन्हा एकदा नाईकांनी टिका करत कोणाच्या तरी लहरीपणामुळे १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आला. मात्र, लहरीपणातून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज नवी मुंबई जनतेवर टाकू देणार नाही. निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गाव बाहेर काढू. ही गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुर्ण पुण्याई कामाला लावेल असा थेट इशारा नाईकांनी दिला. अशातच भाजपाच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र १४ गावांच्या समावेशाला पाठिंबा दिला असल्याने भाजपातच जुंपल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य सरकारने कल्याण तालुक्यातील दहिसर, नावळी,निगू, मोकाशी पाडा, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. भौगोलिकदृष्ट्या ही गावे ठाणे महापालिका हद्दीला लागून आहेत. नवी मुंबई आणि या गावांमध्ये एक अख्खा डोंगर येतो. असे असले तरी लोकसभा निवडणुकीतील मतांचे गणित लक्षात घेता या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला. सुरुवातीच्या काळात ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत होती. मात्र, वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून या गावांमध्ये महापालिका नको असे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती.

मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत नागरी सुविधांअभावी या गावात महापालिकेशिवाय विकास होत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांच्या मागणीनंतर लोकसभेच्या काळात या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आला. मात्र नवी मुंबईतील १०० सेवाभावी उपक्रमाच्या सुवर्ण गौरव महोत्सवावेळी बोलतानाही गणेश नाईक यांनी १४ गावांवरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. मला ही १४ गाव आमच्यात नको असे मुख्यमंत्र्यांकडे सांगितले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गाव आपण बाहेर काढू. ही गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुर्ण पुण्याई कामाला लावेल. ती लोक देखील आमचीच आहेत. परंतु कोणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी मुंबई जनतेवर का आम्ही टाकू असा स्पष्ट प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मंदा म्हात्रे काय म्हणाल्या ?

एकीकडे भाजपचे नेते गणेश नाईक यांचा १४ गावांना नवी मुंबईत समाविष्ट करण्यास विरोध असतानाच भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र या निर्णयास पाठिंबा दिला आहे. याविषयावर बोलत असताना, १४ गावांचे जे प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांच्या ही जमिनी गेल्या आहेत. ती गाव नवी मुंबई महापालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतली पाहिजेत. तेथील स्थानिक आमदार आहे माझा पुर्ण या १४ गावांना पाठिंबा आहे. ही १४ गावे महापालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेऊन त्या तिथल्या ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे असे त्या मंदा म्हात्रे म्हणाल्या.